मुंबई : अंगावर रॉकेल ओतून व पेटवून देऊन पत्नीचा खून केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका आरोपीने आठ वर्षांहून अधिक तुरुंगवास भोगल्यानंतर उच्च न्यायालयाने संशयाचा फायदा देऊन अपिलात त्याची निर्दोष मुक्तता केली.
अशाप्रकारे न केलेल्या खुनाबद्दल प्रदीर्घ तुरुंगवास भोगाव्या लागलेल्या आरोपीचे नाव संजय विष्णू बर्डे असे आहे. आता वयाची पंचेचाळीशी पार केलेला संजय मोलमजुरी करून चरितार्थ चालविणारा मजूर असून तो मुळचा नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील हिसवाल खुर्द गावातील आहे.
दि. ८ मार्च २०१० रोजी पत्नी ताई ऊर्फ लहानुबाई सायंकाळी स्वयंपाक करत असताना संजयने अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले, असा आरोप होता. धाकटा दीर किशोर याच्याशी लहानुबाईचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून संजयने हा गुन्हा केला असे अभियोग पक्षाचे म्हणणे होते. ६० टक्के भाजलेल्या लहानुबाईचे नंतर नऊ दिवसांनी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निधन झाले होते.मालेगाव येथील सत्र न्यायालयाने २० जून २०११ रोजी जन्मठेप ठोठावल्यानंतर लगेच महिनाभरात संजयने उच्च न्यायालयात अपील केले. त्यानंतर आठवडाभरात ते सुनावणीसाठी दाखल करून घेतले गेले. त्यानंतर तीन महिन्यांनी संजयने जामिनासाठी अर्ज केला. परंतु तो फेटाळला गेला. त्याच वेळी जामीन दिला गेला असता तर संजयला आयुष्याची आठ वर्षे तुरुंगात काढावी लागली नसती.