वसई - वसईतील जोडप्यावर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणी तीन दिवस उलटूनही पोलिसांना कसलाच सुगावा लागलेला नाही. हा हल्ला वैयक्तिक वैमनस्यातून झाला आहे का याबाबत वालीव पोलिसांनी तपास कऱण्यास सुरवात केली असून दोघांच्या निकटवर्तीयांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दहिसर येथील कांदरपाडा येथे राहणारे अविनाश तिवारी (४१) हे सीमा अग्रवाल (३८) मंगळवारी रात्री हे दोघे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील एका हॉटेलात जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते रात्री अडीचच्या सुमारास मुंबईच्या दिशेने घरी जाण्यासाठी निघाले होते. तिवारी यांनी आपली दुचाकी विरूध्द दिशेच्या मार्गिकेवरून काढली आणि रस्ता ओलांडण्यासाठी थांबले होते. त्यावेळी अचानक समोर आलेल्या एका अज्ञात इसमाने दोघांवर अॅसिड फेकले. तिवारी लगेच जवळच्या पेट्रोलपंपाजवळ गेले आणि तिथे असलेल्या लोकांनी पाणी मारून अॅसिडची तीव्रता कमी कऱण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अॅसिडमुळे गंभीर भाजल्याने त्या दोघांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिवारी यांचा मृत्यू झाला तर सीमा विश्वकर्मा यांच्या हात आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेया घटनेला तीन दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप कुठलाही सुगावा मिळालेला नाही. हे दोघे लिव्ह अॅण्ड रिलेशनशीपमध्ये रहात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. घटनेचे सीसीटीव्ही मिळाले नाही. हल्ल्यासाठी वापरलेले अॅसिड हे तीव्र क्षमतेचे होते. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठिवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात तिवारी आणि विश्वकर्मा यांच्या निकटवर्तियांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. हा हल्ला वैयक्तिक वैमन्यसातून घडला असावा अशी शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.