सोलापूर : चौदा वर्षांपूर्वी कोठडीचे लोखंडी गज वाकवून पळालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान, कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र. 3/2007 IPC 379 या गुन्हामध्ये पोलिसांनी अटक केलेला अमोल विश्वनाथ परवे (वय - २१ वर्षे, रा. रांधिवेवडी, टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली होती. तो पोलीस कोठडीत असताना कोठडीचे गज वाकावून, लॉकअप मधून पळून गेला होता. त्यामुळे कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे गु.नो. क्र. 8/2007 IPC 224 प्रमाणे दुसरा गुन्हा दाखल झाला होता.
कोठडीतून पळून गेल्यानंतर गेल्या १४ वर्षापासून तो मिळून येत नव्हता. या आरोपीच्या शोधासाठी लोहमार्ग पोलिसांनी ठिकठिकाणी पथके पाठविली होती. दरम्यान, आरोपीची गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की तो एस टी बसने बाहेरगावी जाणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यामुळे लागलीच कुर्डूवाडी एस टी बस स्टँड येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस कॉन्स्टेबल इनामदार, प्रमोद शिंदे, नवनाथ सावंत, चालक अमोल जाधव यांनी सापळा लाऊन शिताफीने ताब्यात घेऊन नंतर अटक केली.