लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वयोवृद्ध जिजाबाई केदार या महिलेची गळा चिरून हत्या केल्यानंतर त्या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या नारायण विजयलाल केवट (२७) याच्यासह हा गुन्हा केल्याचे माहिती असताना, ती माहिती लपवून मारेकऱ्याला मदत करणारी त्याची आई सुभावती (४७) हिला श्रीनगर पोलिसांनी अटक केली. तसेच हा गुन्हा अवघ्या १२ तासाच्या आत उघडकीस आणला. ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून अटक केलेल्या मायलेकांना येत्या १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वागळे इस्टेट,किसननगर नं. २,संजय गांधी नगर, शिवदेवी मंदिराचे बाजुला, पाईप लाईन जवळ मयत जिजाबाई केदार (६५) आणि मारेकरी नारायण आणि त्याची आई सुभावती केवट हे शेजारीच राहत. ५ सप्टेंबरपासून मयत जिजाबाई या हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.तसेच मयत महिलेच्या राहते घराला बाहेरून कुलुप लावलेले व घरातुन दुर्गधी येत असल्याची बाब पुढे आल्यावर पोलिसांनी त्या घराचे कुलूप तोडले. त्यावेळी घरामध्ये जिजाबाई यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळुन आला.
याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्या पथकाने कोणताही सुगावा नसताना मोठया कौशल्याने व चिकाटीने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणत मारेकऱ्याला अटक केली.तसेच या गुन्ह्यांची माहिती असताना ती माहिती लपविण्यासाठी मदत करणाऱ्या मारेकऱ्याची आई सुभावती हिचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर अटक केली.
मयत महिला त्याच परिसरात भिशी चालवत असून ती सावकारीचे ही काम करीत असे, तसेच तिचा नवरा हा १५ वर्षांपासून बेपत्ता असल्याने ती एकटीच राहत होती. तर मारेकरी हा नशेबाज असून तो कोणताही कामधंदा करत नसल्याचे तपास समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.