मंगेश कराळे -नालासोपारा - गावावरून आलेल्या ३४ वर्षीय मूकबधिर तरुणाला लुटण्याच्या इराद्याने आरोपीने गळा आवळून त्याची हत्या करून मृतदेह निर्जळस्थळी फेकून दिला होता. मात्र, मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा व गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी कसून तपास करत ७२ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला आहे. महत्वाचे म्हणजे, आरोपीसंदर्भात कोणताही पुरावा नसताना संयुक्त तपास करून हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश मिळाल्याचे गुन्हे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
नायगावच्या ऑरनेट लिंक रोड ते स्टार सिटीकडे जाणाऱ्या कच्चा रोडच्या डाव्याबाजूला असलेल्या मोकळ्या जागेत सुनिल तिवारी (३४) या मूकबधिर तरुणाला आरोपीने २० डिसेंबरला सायंकाळी मारहाण करुन पांढऱ्या रंगाच्या उपरण्याने त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली होती. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यास निर्जन स्थळी टाकले होते.
याप्रकरणी वालीव पोलिसांनी हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यात मृताची ओळख पटली होती. परंतु तो मुकबधीर होता तसेच तो नुकताच गावाहून आला होता. त्यामुळे त्यास कुणी मारले व का मारले. त्याला नालासोपारा येथे जायचो होते. मग तो नायगाव स्टेशन येथे का उतरला यासंदर्भात पोलिसांना कसलाच उलगडा होत नव्हता.
या प्रकरणी, गुन्ह्याचा कसोशीने तपास करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांनी मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा व गुन्हे शाखा युनिट दोन यांना दिले होते. यानंतर, गुन्हे शाखेने समांतर तपास करत, पथकातील अधिकारी/अंमलदार यांनी घटास्थळाला भेट देवून परिसराची बारकाईने पाहणी केली. आणि सलग तीन दिवस अहोरात्र मेहनत घेवून तांत्रीक पुरावे हस्तगत केले. तसेच साक्षीदारकडे सखोल तपास करून आरोपी यशवर्धन अशोक झा (२१) याला ऑर्नेट गॅलक्सी इमारतीतील राहत्या घरातून शुक्रवारी ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्हाच्या अनुषंगाने प्राथमिक तपास करता, त्यानेच तरुणाला लुटण्याकरीता सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
मयत सुनील हा नुकताच उत्तर प्रदेशातील जौनपूर गावावरून रेल्वेने आला होता. तो मुकबधीर असल्यामुळे त्याचेकडे मोबाईल नव्हता. त्यावेळी त्याने आरोपीस त्याचेकडील चिठ्ठीवरील मोबाईल नंबरवर संपर्क करुन नालासोपारा येथील भावास स्टेशनवर बोलावण्यासाठी विनंती केली. त्यावेळी आरोपीने त्याची असहाय्यता लक्षात आल्याने त्याला लुटण्याचा प्लान तयार केला. त्यानुसार आरोपीने चिठ्ठीवरील भावाचा फोन बंद असल्याचा बहाणा करुन त्याचा फोन संपर्क होताच भावाला बोलावून घेईल असे सांगितले. तोपर्यंत मी जवळच रहावयास असून बॅचलर आहे, असे सांगून भावाचा फोन चालू होईपर्यंत माझे घरी येवून आराम करावा असा बहाणा करुन सुनीलला नायगावच्या एका निर्जनस्थळी घेवून गेला. सदर ठिकाणी नेल्यानंतर तो मुकबधीर असल्याचा व असहाय्यतेचा गैरफायदा घेवून त्याचे पैसे व साहीत्य लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु सुनीलने त्यास विरोध केला. त्यामुळे आरोपी यशवर्धन झा याने त्यास दगडाने चेहऱ्यावर गंभीर दुखापत करुन त्याच्या खांदयावरील उपरण्यानेच त्याचा गळा आवळून निघृणपणे खुन करुन मृतदेह जागीच गवतात टाकून पळून गेला होता.