नालासोपारा (मंगेश कराळे) :-
चोरी व जबरी चोरी करणाऱ्या सराईत दुकलीला अटक करून आचोळे पोलीस ठाण्यातील दाखल चार गुन्ह्यांची उकल करण्यात आचोळे गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी मंगळवारी दिली आहे. आचोळे पोलीस दोन्ही आरोपींकडे तपास व चौकशी करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मार्चला रात्री इरशाद मोहम्मद रफी सय्यद हे एव्हरशाईन सिटी ते संत सेवालाल नगरकडे जाणाऱ्या रत्यावरुन आचोळे गाव या दिशेने हातामध्ये फोन घेवुन पायी चालत जात होते. त्यावेळी फिटनेस क्विन जिमचे समोर आले असता त्यांचे पाठीमागुन दोन आरोपींनी दुचाकीवरून येवुन त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरीने खेचून चोरी करुन पळुन गेले होते. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. वसई - नालासोपारा परिसरात गेल्या काही महिन्यांपासुन चोरी व जबरी चोरी गुन्हयांत वाढ झाली होती. सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले होते.
आचोळे पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाव्दारे प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी विनायक पद्मा पुजारी आणि जनक महाविर सिंग साऊद या दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन तपास केल्यावर त्यांनी नमुद गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. अटक आरोपीकडे अधिक तपास करुन ४ गुन्हे उघडकीस आणून ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुधिर गवळी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुहास म्हात्रे, संदिप भोसले, सहाय्यक फौजदार राजेश काळपुंड, पोलीस हवालदार दत्तात्रय दाईंगडे, करण भवर, बालाजी संगमे, विनायक कचरे, मोहनदास बंडगर यांनी केली आहे.