कल्याण : जागेच्या वादातून झालेल्या हाणामारीदरम्यान एका महिलेवर चक्क ॲसिडहल्ला झाल्याची घटना गुरुवारी पूर्वेकडील नेतिवली परिसरातील आनंदनगर वसाहतीमध्ये घडली. या हल्ल्यात महिलेसह तिच्यावर हल्ला करणारा आणि भांडण सोडवण्यासाठी आलेला एकजण जखमी असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.आनंदनगर वसाहतीत मोहजबीन मोमीन ही महिला वास्तव्यास आहे. तिच्या घरामागे आरोपी टिंकू मंडल हा राहतो. त्याचा टॅटू काढण्याचा व्यवसाय आहे. यावरून त्या दोघांमध्ये वाद आहे. गुरुवारी दुपारी साडेचार वाजता मोहजबीन टिंकूच्या घरी गेली असता, त्यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी टिंकूने रागाच्या भरात तिच्या अंगावर ॲसिड टाकले. यात मोहजबीन १५ टक्के भाजली आहे. तिच्यासह टिंकू हादेखील किरकोळ जखमी झाला आहे. याशिवाय, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या अन्य एकाच्या अंगावर ॲसिड पडल्याने जखमी झाला आहे. याप्रकरणी मोहजबीन हिने दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, टिंकू मंडल आणि त्याची पत्नी रेणू मंडल या दोघांना अटक करण्यात आली आहे. टिंकू हा टॅटू काढण्याचे काम करत असल्यामुळे त्याच्याकडे ॲसिड होते, अशी माहिती तपासात उघडकीस आली आहे.
जागेच्या वादातून कल्याणमध्ये महिलेवर केला ॲसिडहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 2:46 AM