कानपूर - एसीपी मोहसिन खान याने आयआयटी कानपूरमध्ये पीएचडी स्कॉलरवर कथित बलात्कार केल्याचा आरोप झाला आहे. कल्याणपूर पोलीस ठाण्यात एसीपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागाकडून विशेष परवानगी घेऊन कलेक्टरगंज सर्कलमध्ये तैनात एसीपी मोहसिन खान डिसेंबर २०२३ साली आयआयटी कानपूरमधील पीएचडी स्कॉलर युवतीच्या संपर्कात आला होता.
FIR नुसार, मागील जून महिन्यात मोहसिनने स्कॉलर युवतीच्या मार्गदर्शनात पीएचडी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या युवतीने मोहसिनची मदत केली आणि त्याला मार्ग मिळाला. या दोघांमध्ये जवळीक वाढली तेव्हा मोहसिनने युवतीला प्रपोज केले. पत्नीला तलाक देऊन तुझ्याशी लग्न करेन असं मोहसिनने युवतीला आश्वासन दिले. त्याचवेळी ब्रेकअपच्या विरहातून जाणारी पीएचडी स्कॉलर युवती मोहसिनच्या प्रेमात पडली.
गर्भवती पत्नीसोबत राहण्याची ऑफर
नोव्हेंबरमध्ये मोहसिनची पत्नी गर्भवती असल्याचं कळलं तेव्हा मोहसिनने कुटुंबाचा दबाव असल्याचं सांगत युवतीची माफी मागितली. ही युवती मोहसिनच्या घरी गेली तेव्हा त्याच्या पत्नीने तिला सोबत राहण्याची ऑफर दिली. त्यानंतर ही युवती मानसिक आजारी असल्याचं मोहसिनने अनेकांना बतावणी केली. या दोघांमधील वाद अखेर पोलीस स्टेशनला पोहचला. काही दिवसांपर्यंत हा वाद दडपण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर गुरुवारी लखनौ, दिल्लीपर्यंत प्रकरण पोहचताच पोलीस अधिकारी आयआयटीत पोहचले. त्याठिकाणी युवतीचा २ तास जबाब नोंदवून अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण?
एसीपी मोहसिन खान कानपूर पोलीस आयुक्तालयात कार्यरत होते. त्यांच्यावर आयआयटी कानपूरमधील एका पीएचडी स्कॉलर युवतीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. मोहसिनचे आधीच लग्न झाले होते. त्याला एक मुलगाही आहे. परंतु युवतीला अविवाहित असल्याचं सांगून ओळख वाढवली आणि जेव्हा तो विवाहित असल्याचं कळलं तेव्हा पत्नीला तलाक देणार असल्याचं खोटं युवतीला सांगितले. हे प्रकरण उघडकीस येताच मोहसिन खानला पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी एसीपींनी अनेक प्रयत्न केले. त्यात मुलीला गप्प करण्यासाठी तिला ऑफरही दिली परंतु त्याचवेळी मोहसिनने काही अधिकाऱ्यांसमोर ही मुलगी मानसिक आजारी आहे असं म्हटलं त्यामुळे युवती संतापली आणि तिने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली.