लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांनी दारूच्या नशेत धावत्या कारमध्ये एका महिलेशी अश्लील चाळे केले. नंतर घरी गेल्यावर त्या महिलेच्याच बेडरूममधील वॉशरूम वापरण्यासाठी आग्रह करीत तिचा पती, दीर, सासूला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. हा प्रकार शनिवारी मध्यरात्रीनंतर 2.30 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी ढुमेंच्या विरोधात विनयभंगासह घरात घुसल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
पीडिता पती, मुलीसह एका रेस्टॉरंटमध्ये रात्री जेवण्यासाठी गेली होती. तिथे ढुमे हे मित्रासह आले होते. पीडितेच्या पतीची ढुमेंसोबत ओळख होती. डुमॅनी पतीला पोलिस आयुक्तालयासमोर सोडण्याची विनंती केली. पावणेदोन वाजता सर्व कारने निघाले. पीडिता पुढील सीटवर मुलीसह बसली होती. ढुमे मागच्या सीटवर होते. त्यांनी मागून पीडितेसोबत अश्लील चाळे सुरू केले. नंतर ते पीडितेच्या घरी गेले. पीडितेच्या बेडरूममधील वॉशरूम वापरण्याचा आग्रह केला. दुर्मेनी सासू आणि पतीला शिवीगाळ केली. पतीने पोलिसांना बोलवले. नागरिकही धावले. पोलिस ढुमेना घेऊन गेले.
तडकाफडकी बदली
पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी एसीपी ढुमे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली. घटनेचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला. निलंबनाचा निर्णय गृह मंत्रालयस्तरावरच होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.