लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दारूच्या नशेत मित्राच्या पत्नीचा विनयभंग करणारे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांच्या निलंबनाचे आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने बुधवारी काढले. एका महिलेशी लगट करीत घरात घुसून मारहाण, शिवीगाळ करण्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणात सिटी चौक पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सिडको एन- १ येथील पाम रेस्टॉरंट येथून गाडीत बसल्यानंतर मित्राच्या पत्नीसोबत लगट करण्याचा प्रयत्न एसीपी ढुमे यांनी केला होता. त्यानंतर पीडितेच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या बेडरूममधील बाथरूम वापरण्यासाठी ढुमे यांनी पीडितेचा पती, दीर, सासूला शिवीगाळ व मारहाण केली होती. या प्रकरणात गुन्हा नोंदविल्यानंतर ढुमे यांच्या निलंबनासाठी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी पोलिस महासंचालकांना प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी निलंबनाचे आदेश काढले. शासनाच्या आदेशात नागरी सेवा नियमानुसार त्यांना १६ जानेवारीपासूनच सेवेतून निलंबित केल्याचे म्हटले आहे.