मुंबई - तीन वर्षापूर्वी अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी ब्राझीलच्या ४० वर्षीय महिलेला मुंबई विमानतळावरूनअटक करण्यात आली होती. कार्ला इन्स पिंटो असं या महिला आरोपीचे नाव होते. तिच्याजवळून पोलिसांनी ४८० ग्रॅम कोकेनचे ८ कॅप्सुल हस्तगत केले होते. सबळ पुरावे असताना देखील तपास अधिकाऱ्यांनी नियमांचे पालन न करत केलेल्या कारवाईमुळे या महिलेला निर्दोष सोडण्याची नामुष्की ओढावली.
अमली पदार्थ विरोधी कायद्याअन्वये तीन वर्षांपूर्वी या महिलेला अमली पदार्थासह अटक केली होत. तिने अनोखी शक्कल लढवून अमली पदार्थ तिच्या गुप्तांगात लपवून आणले होते. अटकेनंतर तपास अधिकाऱ्यांनी कायद्याचे पालन न करता तपास केला. त्यावर महिलेचे वकील तारक सय्यद यांचा हा युक्तीवाद न्यायालयाने मान्य केला. कलम ५० नुसार जवळ असलेल्या कुठल्याही मॅजिस्ट्रेट किंवा गॅझेट अधिकाऱ्याच्या समक्ष तपासणी करण्याचा अधिकार आरोपीला आहे. मात्र, तपास पथकाने आरोपीचा हा अधिकार डावलला, असं सय्यद यांनी युक्तिवाद केला.
स्पॅनीश बोलणाऱ्या आरोपी महिलेला इंग्रजी कळत नसतानाही तिला तपासणी अधिकाऱ्यांनी माहिती इंग्रजी भाषेत दिली गेली. तसेच महिलेचा जबाब घेतल्यानंतर तिला दुभाषी उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे तपासादरम्यान कलम ५०मधील नियमांचं पालन न झाल्याचं यातून स्पष्ट होतं म्हणूनच महिलेकडून कुठल्याही प्रकारची वसुली अवैध आहे. शिवाय आरोपी महिलेविरोधात सबळ पुरावेही सादर करण्यात आले नाहीत. यामुळे हे प्रकरण संशयास्पद असल्याचं नमूद करत न्यायालयाने आरोपी महिलेची निर्दोष मुक्तता केली. अमली पदार्थ विरोधी विभागाने तीन वर्षांपूर्वी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे गुप्तचर अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई केली गेली होती, असं अमली पदार्थ विरोधी विभागाकडून न्यायालयात सांगण्यात आलं.