म्हापसा - किनारी भागात उघड्यावर मद्यप्राशन करुन दंगामस्ती करणा-या पर्यटकांवर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. कळंगुट तसेच हणजूण किनारी भागात मागील दोन दिवसात एकूण १३ पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
कळंगुट निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या कळंगुट किनारी भागात ही विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. केलेल्या कारवाईत येथील फुटपाथवर दोन पर्यटकांना, किनाºयावर चौघांना तर पे पार्किंग परिसरात तिघांना ताब्यात घेण्यात आले. यात कोल्हापूरातून आलेल्या तिघांचा समावेश आहे. तसेच इतर पर्यटक कर्नाटक व आंध्र प्रदेशातील आहेत. या सर्वांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. अति मद्यप्राशन करुन दंगामस्ती करणे व त्यातून सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली सदरची कारवाई करण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी सोमवारी हणजूण पोलिसांनी केलेल्या कारवाई चौघांना याच गुन्ह्याखाली अटक केली होती. त्यात आंध्र प्रदेश व केरळातील पर्यटकांचा समावेश होता.
पर्यटन मोसम ऐन भरात असताना पर्यटकांकडून मद्य प्राशन करुन होणा-या दंगामस्ती व उपद्रवाच्या बºयाच तक्रारी लोकांकडून दाखल करण्यात आल्या होत्या. केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेवून ही कारवाई पोलिसांकडून करण्यात आली आहे. मद्यप्राशन करणा-या या पर्यटकांकडून नंतर बाटल्या फोडणे, नशेत आंघोळीला जाणे असेही प्रकार केले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाढत्या या प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस गस्तीत वाढ करण्यात आली असल्याची माहिती दळवी यांनी दिली. वाढलेल्या गस्तीमुळे ब-याच अंशी असे प्रकार नियंत्रणास आणण्यात मदत मिळाली असल्याचे ते पुढे म्हणाले. २०१८ साली कळंगुट भागात सुमारे ३५ पर्यटकांवर कारवाई करण्यात आली होती.