डोंबिवली - रिक्षा वाहन तपासणी मोहीमेंतर्गत कल्याण आरटीओ परिक्षेत्रात १०२५ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ५२ वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.
ते म्हणाले की, विना लायसन, विना बॅज, विना परवाना वाहन करणे, भाडे नाकारणे आदी संदर्भात सातत्याने तक्रारी वाढल्या होत्या. त्यानूसार परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशांनूसार बुधवारी ही कारवाई करण्यात आली. कल्याण,डोंबिवलीमधील भिवंडी-कोन, दुर्गाडी आधारवाडी, उंबर्डे, गांधारी पूल, लाल चौकी, पारनाका, दुधनाका, पत्रीपूल, बैलबाजार आदी ठिकाणी, तसेच कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्व, पश्चिम सर्वत्र ही कारवाई करण्यात आली. त्यासाठी वायुवेग पथकाचेही सहाय्य मिळाल्याचे ससाणे म्हणाले. जप्त करण्यात आलेली वाहने ही बस स्टँड, रामनगर पोलिस ठाणे, तसेच कल्याण आरटीओ क्षेत्रात ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.