ठाणे - जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध पुनर्विलोकन समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी तालुका समितीने बोगस डॉक्टरां विरुध्द केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागात दवाखाना सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीने ना-हरकत प्रमाणपत्र देण्यापूर्वी दवाखाना सुरु करणाऱ्या वैद्यकीय व्यवसायिकाचे प्रमाणपत्र तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठवावे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांनी सांगितले.
यावेळी अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड या तालुक्यातील बोगस डॉक्टरांसंबंधी करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. बोगस डॉक्टरांवर कारवाई करताना पोलीस विभागाने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते संरक्षण देण्याची सूचना डॉ.रेंघे यांनी यावेळी केली.
ठाणे जिल्ह्यातील आता पर्यंत अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड या पाच तालुक्यांमध्ये ऑक्टोंबर अखेर पर्यंत ३७ बोगस डॉक्टर आढळून आले असून त्यातील ३१ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील ३१ प्रकरणे ही न्याय प्रविष्ठ असून ३० बोगस डॉक्टरांनी व्यवसाय बंद केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सध्या तालुक्यात एकही बोगस डॉक्टर कार्यान्वित नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
बोगस डॉक्टरांना व्यवसाय सुरु करण्यापासून रोखण्यासाठी ग्रामीण भागात दवाखाना सुरु करण्याची परवानगी देताना ग्रामपंचायत अथवा नगरपंचायत यांनी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबंधित डॉक्टरची शैक्षणिक अर्हता आणि अन्य कागदपत्रे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठवावे. अशा स्वरुपाचे पत्र संबंधित यंत्रणांना देण्यात येईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रेंघे यांनी सांगितले. बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त श्री.खापेकर आणि तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.