सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील विविध पोलीस ठाण्यात गावठी दारू विक्री प्रकरणी एकून ८ गुन्हे दाखल झाले असून ११ जणांना अटक केली. त्यांच्याकडून गावठी दारूच्या साठ्यासह रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली.
उल्हासनगरात अंमली पदार्थ व गावठी दारूच्या अड्ड्या बाबत चर्चा सुरू झाल्यानंतर उल्हासनगर, मध्यवर्ती, विठ्ठलवाडी व हिललाईन पोलिसांनी आपआपल्या हद्दीतील गावठी दारू अड्ड्यावर शुक्रवारी धाडी टाकून गावठी दारू साठ्यासह रोख रक्कम हस्तगत केली. मध्यवर्ती पोलिसांनी सावित्रीबाई फुलेनगर मध्ये गावठी दारूची विक्री करणाऱ्या अर्जुन वाघेला यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला. तर उल्हासनगर पोलिसांनी दोन गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकून जनार्धन बिऱ्हाडे व बीपीन झा यांना अटक करून गुन्हा दाखल केला. विठ्ठलवाडी पोलिसांनी ३ गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकून अंकुश जाधव, अनिल लष्करे, राहुल उजैनवाल, राकेश वाल्मिकी, जितेंद्र वाघ, प्रमोद यादव यांना अटक केली. तर हिललाईन पोलिसांनी दोन गुन्हे दाखल करून विजय गायकर व हरी थोरात यांना अटक केली.
शहरात पहिली वेळ एकाच दिवशी तब्बल ८ गावठी दारू अड्ड्यावर उल्हासनगर, मध्यवर्ती, विट्ठलवाडी व हिललाईन पोलिसांनी धाड टाकून ११ जणांना अटक केली. त्याच्याकडुन रोख रक्कमेसह गावठी दारूचा साठा हस्तगत केला. शहरातील झोपडपट्टी भागात गावठी दारूची विक्री सर्रासपणे होत असून असे अड्डे उध्वस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच पानटपरीवर नशेली पदार्थाची विक्री होत असल्याची ओरड होत आहे. अश्या पानटपरीवर कारवाईची मागणी होत आहे.