सदानंद नाईक
उल्हासनगर : पोलीस परिमंडळ-४ मधील गुन्हेगारांचा मुसक्या वळविण्यासाठी जग्गु सरदार उर्फ जगदीश लबाना यांच्यासह ४ जणांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी सायंकाळी दिली. तसेच तीन गुन्हेगारावर कारवाई सुरू असण्याचे संकेत दिले.
उल्हासनगर पोलीस परिमंडळ-४ अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आदी गंभीर गुन्ह्याअंतर्गत जग्गु सरदार उर्फ जगदीश लबाना, प्रेमचंद उर्फ बाबू पंजाबी उर्फ तट्टू मनोहर ढकनी, स्वप्निल कानडे व अनिल उर्फ अन्या धिवरे यांच्यावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली. उल्हासनगर पोलीस ठाणे येथे बुधवारी सायंकाळी पोलीस उपायुक्त मोहिते यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यातील जग्गु सरदार या गुन्हेगाराने भाजप नेते प्रकाश माखिजा यांच्या कार्यालयाची गेल्या महिन्यात तोडफोड करून एकाला मारहाण केली होती. या कारवाईसह ३ जनावर एमपीडीए अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे मोहिते म्हणाले. याशिवाय सन-२०२१ मध्ये एकून ४८ गुन्हेगारावर तडीपाराची कारवाई करण्यात आली असून ४० जनावर तडीपार कारवाई सुरू असल्याचे माहिती त्यांनी दिली. पोलीस उपयुक्त प्रशांत मोहिते यांच्या धडक कारवाईने गुन्हेगारात खळबळ उडाली असून अनेक गुन्हेगार भूमिगत झाल्याची चर्चा सुरू झाली.