नवीन पनवेल : पनवेल तालुका पोलिसांनी कोन येथील गोल्डन नाइट बार आणि हॉटेल नाइट रायडर बार अँड ऑर्केस्ट्रा या दोन बारवर कारवाई करून तब्बल ४२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखा कक्ष एकने कोन येथील क्रेझी बॉईज बार अँड रेस्टॉरंटवर कारवाई करून २६ ते २७ जणांवर गुन्हा दाखल केला होता.
कोनगाव येथील गोल्डन नाइट बार या ठिकाणी लेडीज वेटर अश्लील हावभाव करून ग्राहकांशी शारीरिक लगट करत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी साध्या वेशात गोल्डन नाइट बारमध्ये प्रवेश केला. यावेळी अश्लील हावभाव, कृत्य सुरू असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी आठ महिला, तीन पुरुष वेटर, विजय बोगरा नाईक (मॅनेजर), गोपाळ जानू म्हात्रे, विश्वनाथ शेखर देवाडिगा व एक अनोळखी इसम अशा एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल केला.
तर कोन येथील हॉटेल नाइट रायडर बार अँड ऑर्केस्ट्रामध्ये ग्राहकांच्या मनोरंजनासाठी हॉटेलमधील महिला सिंगर या अंगप्रदर्शन तसेच अश्लील हावभाव करून ग्राहकांना आकर्षित करत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली असून १८ महिला सिंगर, सुधाकर कृष्णा शेट्टी (मॅनेजर), हरीश बेगू शेट्टी (मॅनेजर), तीन वेटर, चार ग्राहक अशा एकूण २७ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
कारवाई होऊनही परिस्थिती जैसे थे पनवेलमधील बारवर वेळोवेळी कारवाई होऊनदेखील सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केले जात आहे. महिला अश्लील हावभाव, नृत्य करून ग्राहकांना आकर्षित करतात. दोन वर्षांपूर्वी एका बारमध्ये सिंगर म्हणून काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. येथील बारवर कारवाई होऊनदेखील गैरधंद्यांना ऊत आल्यामुळे या बारचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी मनसे महिला जिल्हाध्यक्ष आदिती सोनार यांनी केली आहे.
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबारलेडीज सर्व्हिस व ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सर्रासपणे डान्सबार सुरू असल्याचे समोर आले आहे. येथील बहुतांशी बार हे शेट्टी (अण्णा) यांना भाड्याने चालविण्यासाठी दिलेले आहेत. बारमध्ये कायदा धाब्यावर बसवून गैरमार्गाने पैसा कमावला जात आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी पुन्हा एकदा या गैरकृत्यांकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.