पुणे : नाताळ व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध मद्य विक्री विरोधातील धडक मोहिमेत पिंपरी येथे गोवा राज्यातील निर्मित मद्याचा अवैध्य साठा विक्री करताना जप्त करण्यात आला. त्यात ७० हजार ७२० रुपये किमतीच्या १२ मद्य पेट्या जप्त केल्या. गोवा राज्यात निर्मिती केल्या जाणाऱ्या मद्याची विक्री पिंपरी येथील अशोक थिएटरच्या मागे केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सोमवारी (दि.२४) मद्य विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. नागेश मारुती सावंत (वय २८,रा.पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओव्हाळ, अधिक्षक डॉ. बी. एस. तडवी, उपाधिक्षक संजय पाटील, सुनील फुलपगारे, अर्जुन पवार, निरिक्षक उपनिरिक्षक एस. आर. दाबेराव, ए. ए. सुतार, सदुनी गवारी, जवान दरेकर यांनी ही कारवाई केली. अवैध ठिकाणाहून मद्य खरेदी न करता अधिकृत सरकारमान्य दुकानातूनच मद्य खरेदी करावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले असून अवैध मद्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी एस. आर. दाबेराव यांनी केले आहे.
पिंपरीत राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध मद्य विक्रीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 6:10 PM