संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या हाथरस बलात्कार प्रकरणातील महत्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने या केसमधल्या चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला आहे. हाथरसच्या घटनेनंतर तीन महिन्यांनी सीबीआयने आरोपींविरोधात हाथरसमधील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे आणि या आरोपपत्रामध्य़े आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचा आरोप लावण्यात आला आहे. त्यानंतर पीडितेची वकील सीमा कुशावह यांनी आजतकशी बोलताना सांगितले की, सीबीआयने ४ आरोपींवर आरोपपपत्र दाखल केले आहे, परंतु पीडितेचा मृतदेह प्रशासनाने कुटुंबाला न देता जाळला अद्याप त्यांच्यावर सीबीआयने कोणतेही आरोप लावलेले नाहीत.
उत्तर प्रदेशमधल्या हाथरस गावात १४ सप्टेंबरला २० वर्षीय दलित तरुणीवर चार जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. दिल्लीमध्ये रुग्णालयात उपचार सुरु असतानाच पीडितेचा मृत्यू झाला होता. ३० सप्टेंबरला घराजवळ पोलिसांच्या सुरक्षेत पीडितेवर गुपचुप अंत्यसंस्कार करण्यात आले होतं. कुटुंबाची परवानगी नसतानाही अंत्यसंस्कार झाल्याने देशभरातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त झाला होता. यानंतर ऑक्टोबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद कोर्टाच्या देखरेखेखाली सीबीआय तपास करेल असा आदेश दिला होता. दरम्यान सीबीआयने तपास पूर्ण कऱण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाकडे अतिरिक्त वेळ मागितला होता. २७ जानेवारीला न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.
सीमा पुढे म्हणाल्या की, सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रातून हे आता स्पष्ट झाले आहे की हाथरसव्हे स्थानिक प्रशासन या प्रकरणात खोटा ऑनर किलिंग प्रकरण मानून बलात्कार करणार्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. याप्रकरणी तेथील स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविरूद्ध आरोपपत्रही दाखल केले जावे.पीडितेच्या कुटूंबाबद्दल बोलताना सीमा म्हणाल्या, "पीडितेचे कुटुंब अजूनही उच्च जातीच्या लोकांसोबत राहत आहे, त्यामुळे कुटुंबाला संरक्षण देण्यात आले आहे. पण ते संरक्षण आयुष्यभर आहे काय?" जेव्हा जेव्हा सुरक्षितता वाढविली जाते, तेव्हा त्या गावात कुटुंबाचे आयुष्य धोक्यात येते. मी अलीकडेच त्या खेड्यात गेले आणि मला तेथील लोकांकडून तणावाचे बोल ऐकायला मिळाले. आरोपीची लवकर सुटका होईल या भीतीने ते कुटुंब अस्वस्थ होते.