मुंबई - मुंबईतील लोअर परळ आणि मालाड येथील पासपोर्ट सेवा केंद्रातील (पीएसके) भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) शोधमोहीम सुरू आहे. या झाडाझडतीदरम्यान एका दलालाकडून एक कोटी ५९ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांसह दक्षता विभागाचे अधिकारी आणि विभागीय पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी २६ जूनला परळ व मालाड येथील पासपोर्ट सेवा केंद्रांची अचानक तपासणी केली. यावेळी संशयित अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची आणि मोबाइलचीही तपासणी करण्यात आली. कार्यालयातील कागदपत्रे, सोशल मीडियावरील संदेश आणि यूपीआय आर्थिक व्यवहारांचीही तपासणी करण्यात आली. त्यात संबंधित अधिकारी आणि दलाल यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे आढळले. दलालांचे काम करण्याच्या बदल्यात हे व्यवहार झाल्याचा संशय आहे.
या प्रकरणी सीबीआयने १४ पासपोर्ट अधिकाऱ्यांसह ३२ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत १२ गुन्हे दाखल केले. या प्रकरणी पारपत्र सेवा केंद्रांवरील पारपत्र सहायक आणि दलाल यांच्याशी संबंधित नाशिक आणि मुंबईतील ३३ ठिकाणी सीबीआयने शोधमोहीम राबवून महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. पासपोर्ट अधिकारी अवघ्या दोन ते तीन हजारांतही दलालांशी हातमिळवणी करून त्यांना पासपोर्ट सेवा पुरवत होते, असे निष्पन्न झाले आहे.
अधिकारी-दलाल लागेबांधे सीबीआयने ३० ते १ जुलैदरम्यानही संशयितांच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या. त्यात एका पीएसके दलालाचे घर आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली. यावेळी एक कोटी ५९ लाखांची रोकड आणि पाच डायऱ्या तसेच काही तांत्रिक पुरावे सीबीआयच्या हाती लागले आहेत. या प्रकरणात काही भ्रष्ट पासपोर्ट अधिकाऱ्यांचे दलालांशी असलेले लागेबांधे उघड होत आहेत.