मंगेश कराळे
नालासोपारा :- संघटीतपणे गंभीर गुन्हे करणा-या सराईत आंतरराज्यीय सहा जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून ही कारवाई केल्याचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी माहिती दिली आहे.
४ जानेवारीला दरोडयाची पूर्वतयारीत असलेले कुख्यात आंतरराज्यीय टोळीतील आरोपी मनिष ऊर्फ राजु मोहन चव्हाण, भाऊसाहेब शंकर गवळी, रविंद्रसिंग सुखराम सोलंकी, सुखचेन रेवत पवार, मॉन्टी नंदू चौहान, अश्विनी रुपचंद चव्हाण यांना गुन्हे शाखा कक्ष ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई करून ताब्यात घेवून त्यांचे विरुध्द विरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता.नमूद आरोपीत यांनी संघटीतपणे टोळी तयार करून महाराष्ट्र राज्यातील पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद तसेच मध्यप्रदेश व राजस्थान परिसरात खून, खुनासह दरोडा, सशस्त्र दरोडा, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, चोरी असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी सुखचेन पवार आणि रविंद्रसिंग सोलंकी है सन २०१८ पासुन राजस्थान व मध्यप्रदेश येथील दरोडयाच्या गुन्हयात फरार इनामी गुन्हेगार असून सदर गुन्हयाचे तपासात नमुद अटक आरोपीत यांचेकडुन पोलीस कोठडी दरम्यान मालमत्ते संदर्भाचे गुन्हे उघडकीस आले आहे.
नमूद आरोपींच्या विरुद्ध २९ फेब्रुवारी रोजी अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांचे परवानगीने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) अशी कलम वाढ करण्यात आली असून या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ हे करीत आहे.
उपरोक्त कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोउपनिरी अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, आश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.