बीड : सोशल मीडियावर खोटी माहिती टाकून अफवा पसरविणाऱ्या वडवणी येथील सिंदफणा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक दादासाहेब सूर्यभान जाधवर (४०, रा.वडवणी) यांच्यावर बीड पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सुशिक्षितांकडूनच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच अफवा पसरविल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
३० आॅगस्ट रोजी जाधवर यांना टाकरवण येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र बंद अशी पोस्ट टाकली. त्याची कुठलीही शहानिशा न करता ती पोस्ट जाधवर यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली. हा प्रकार बीड पोलिसांना समजला. पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर यांनी प्रकरणाची शहानिशा करुन दादासाहेब जाधवर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनी चूक झाल्याचे कबूल करताच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
सुशिक्षितांकडूनच उल्लंघनप्रत्येकाच्या हातात अँड्राईड मोबाईल आला आहे. इंटरनेटची सुविधाही आहे. प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय आहे. मात्र, आलेल्या पोस्टची शहानिशा न करता पुढे फॉरवर्ड केली जाते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. असे प्रकार सर्वाधिक सुशिक्षितांकडूनच होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे.