मुंबई - कुपर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील १ लाख रुपये पळवणाऱ्या २ चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही उत्तम कामगिरी सहार वाहतूक पोलिसांनी केली. या दोन्ही चोरट्यांना पुढील कारवाईसाठी जुहू पोलिसांच्या ताब्यात दिले असता गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या चोरट्यांचा फरार झालेल्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. खार पूर्व परिसरात राहणारी रेखा मनोज सांसी (२८) ही दीर अजय सांसी यांच्यासोबत त्वचेच्या उपचारासाठी कुपर रुग्णालयात आली होती. घरात कोणी नसल्याने रेखाने भिशीचे १ लाख रुपये सोबत घेतले. दोघेही रुग्णालयाच्या गेटसमोर रिक्षातून उतरले. रिक्षावाल्याला पैसे देत असताना चोरट्यांची नजर रेखाच्या पर्सवर गेली. रेखा रुग्णालयाच्या गेटच्या आत जाताच पाठीमागून आलेल्या चोरट्याने तिची पर्स खेचली. प्रसंगावधान राखून रेखाने पर्स स्वत:च्या जवळ खेचली. मात्र पर्सची चेन उघडी असल्याने त्यातील १ लाख रुपये ठेवलेली पिशवी चोरट्यांनी पळवली. त्यावेळी रेखाने आरडाओरड करताच तिचा दीर अजय मदतीसाठी धावला. पिशवी घेऊन चोरटे रिक्षात बसून अंधेरीच्या दिशेने सुसाट निघाले. त्यावेळी अजय व रेखा दुसऱ्या रिक्षात बसले आणि चोरट्यांच्या रिक्षाचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, चकाला सिंग्नल येथे चोरट्यांची रिक्षा थांबली. अजय व रेखा यांनी चोरट्यांच्या रिक्षाजवळ जाऊन मदतीसाठी आरडाओरड केली. रेखाचा आवाज कानी पडताच कर्तव्यावर असलेले सहार वाहतूक पोलीस विभागाचे हवालदार प्रकाश कुंभारे व पोलीस शिपाई रमाकांत बडगुजर हे मदतीसाठी धावून आले. त्यावेळी जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन एका चोरट्याने पळ काढला. मात्र मोहम्मद नजीगुल खलीलरुल रेहमान हक (३२) व समीउल्ला सय्यद शेख (६५) यांच्या हवालदार कुंभारे, पोलीस शिपाई बडगुजर यांनी मुसक्या आवळल्या.या दोन्ही चोरट्यांना वाहतूक पोलिसांनी अंधेरी पोलीस ठाण्यात आणले. सदर माहिती जुहू पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणू जुहू पोलिसांनी भा. दं. वि. कलम 394, 34 नुसार गुन्हा दाखल करून दोन्ही चोरट्यांना अटक केली. या चोरट्यांकडून चोरलेले १ लाख रुपये जप्त करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.या उत्तम कामगिरीबद्दल सहार वाहतूक पोलीस शाखेचे हवालदर प्रकाश कुंभारे आणि पोलीस शिपाई रमाकांत बडगुजर यांचे सांसी कुटुंबीयांनी आभार मानले. या कामगिरीबद्दल सहार वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांनी हवालदार कुंभारे व पोलीस शिपाई बडगुजर यांची प्रशंसा केली.
वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; महिलेचे लाखो रुपये पळविणाऱ्या चोरट्यांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 9:05 PM
कुपर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेचे १ लाख रुपये पळवणाऱ्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
ठळक मुद्देया दोन्ही चोरट्यांना पुढील कारवाईसाठी जुहू पोलिसांच्या ताब्यात दिले असता गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. कुपर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील १ लाख रुपये पळवणाऱ्या २ चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.