नवी मुंबई - एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापे टाकून त्यांना बंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन्ही हुक्का पार्लरचे मालक आणि व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच ३२ तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एपीएमसी ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस पथकाने शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास सत्रा प्लाझामधील ‘कॅफे अटलांटिस बार ॲन्ड ग्रील’वर छापा टाकला. छाप्यादरम्यान २२ तरुणांना ताब्यात घेण्यात आले. मालक निकुंज कांतीलाल सावला (२८) आणि व्यवस्थापक अशोक साळवे (३५) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर पथकाने रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास वाशी सेक्टर-२६ मधील कोपरीगाव येथील ‘दिवाणखाना फूड हाऊस ॲन्ड बार’ या हुक्का पार्लरवर छापा टाकला. दरम्यान १० तरुण हुक्का ओढत होते. त्यांना ताब्यात घेण्यात आले. मालक सुशांत राजेंद्र यादव आणि व्यवस्थापक चैतन्य भोसले या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.