भारतासह सर्वच देशात वाहतुकीचे नियम आहेत. रस्ते अपघात टाळण्यासाठी हे नियम बनवलेले असतात. परंतु अनेकदा वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसते. असाच एक प्रकार समोर आला आहे. ज्यात गर्लफ्रेंडला कारमध्ये बसवून १६० किमी प्रति तास वेगाने कार चालवणाऱ्या युवकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहतूक नियम मोडणे आणि अतिवेगात वाहन चालवणे या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील आहे.
Nypost च्या रिपोर्टनुसार, २२ वर्षीय युवक जेवोन पियरे जॅक्सननं मर्सिडिजमधून त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन जात होता. त्यावेळी डिग्रूड्ट रोडवर त्याने १६० किमी प्रतितास वेगाने कार नेली. त्याठिकाणी नियमानुसार ४० किमी प्रतितास ही वेगमर्यादा आहे. युवकाचा हा 'कार'नामा रस्त्याशेजारी असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला. मंगळवारी या घटनेत पोलिसांनी युवकाला अटक केली आहे. पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की, जॅक्सन हा अतिवेगात कार चालवत होता. त्याचसोबत त्याने लेनची शिस्त पाळली नाही. चुकीच्या पद्धतीने अनेक वाहनांना ओव्हरटेक केले. त्याच्या कारमध्ये गर्लफ्रेंडसोबत ३ लहान मुलेही होती ज्यांच्या जीवाला या प्रकारामुळे धोका निर्माण झाला होता.
इतकेच नाही तर जॅक्सनच्या वेगवान कारला वाचवण्याच्या नादात एक पिकअप ट्रॅक रस्त्यात पलटी झाला. ट्रक हा त्याच्या लेनमध्येच होता. परंतु जॅक्सनमुळे तो अपघाताचा बळी पडला. त्यामुळे काही काळ रस्ते वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला होता असंही पोलिसांनी त्यांच्या आरोपपत्रात सांगितले आहे.
गर्लफ्रेंडला इंटरव्यूला घेऊन जात होतामिळालेल्या माहितीनुसार, जॅक्सन त्याच्या गर्लफ्रेंडला एका जॉब इंटरव्यूसाठी घेऊन जात होता. तिला उशीर झाल्यामुळे त्याने कार वेगाने पळवली. पोलिसांनी जेव्हा त्याला पकडले तेव्हा कारमध्ये गर्लफ्रेंडसोबतच आणखी ३ मुले होती. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जॅक्सनचा वाहन चालवण्याचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. त्यासोबत त्याला जेलमध्ये पाठवले आहे. पहिल्यांदाच जॅक्सनने वाहतूक नियम मोडला असे नाही तर याआधाही त्याने अनेकदा हे कृत्य केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.