मीरारोड - मीरारोडच्या मीरा गाव एमआयडीसी भागात बेकायदेशीर उभारलेल्या मराठा तडका ह्या हॉटेलवर अखेर बुधवारी महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. एका नगरसेविकेच्या भावाशी संबंधित हे हॉटेल असल्याने कारवाईस दिरंगाई होत होती.
मीरा एमआयडीसी मार्गावर बेकायदेशीर उभारलेल्या मराठा तडका हॉटेल वर महापालिकेने सुमारे दोन वर्षांपूर्वी कारवाई केली होती. परंतु एका नगरसेविकेच्या भावाचा हॉटेल मध्ये आर्थिक हितसंबंध असल्याने नंतर कारवाईस टाळाटाळ होत होती. त्या नगरसेविकेच्या भावाने एक दैनिकाच्या पत्रकारावर सुद्धा हल्ला केला होता. त्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणा नंतर पत्रकारांनी उपायुक्त मारुती गायकवाड यांची दोन वेळा भेट घेऊन बेकायदेशीर हॉटेल वर कारवाईची मागणी केली होती. गायकवाड यांनी आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशा नुसार स्वतः बेकायदेशीर हॉटेलची पाहणी करून कारवाईचे आदेश प्रभाग अधिकारी यांना दिले होते. अखेर बुधवारी पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून जेसीबीच्या साहाय्याने हॉटेल तोडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासह वीज पुरवठा बेकायदा बांधकामना मिळू नये व कर आकारणी बंद करावी अशी मागणी होत आहे.