सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-२ खेमानी परिसरात राहणाऱ्या गोपाळ शर्मा यांची ऍक्टिव्हा मोटारसायकल कौटुंबिक वादातून गुरवारी मध्यरात्री नातेवाईक महिलेने ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून टाकल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरेमुळे उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगरपोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर कॅम्प नं-२, खेमानी परिसरात गोपाल शर्मा हे कुटुंबासह राहतात. गुरवारी मध्यरात्री घरा समोर पार्किंग केलेल्या ऍक्टिव्हा मोटारसायकलवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून टाकण्यात आली. आगीमुळे घराचा दरवाजासह विजेच्या मिटरचे नुकसान झाले. शेजारील नागरिकांनी गाडीची आग विझविल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल झाला. या गुन्हा प्रकरणी पोलिसांनी शर्मा राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, एक महिला ऍक्टिव्हा गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावून पळत असल्याचे कॅमेऱ्यात दिसले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली ती आग लावणारी महिला शर्मा यांची नातेवाईक निघाली असून कौटुंबिक वादातून आग लावल्याचे उघड झाले. यापूर्वीही गाडीला आग लावण्याचा प्रयत्न झाले. असे शर्मा म्हणाले आहे.
उल्हासनगर पोलिसांनी शर्मा यांच्या ऍक्टिव्हा गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकून गाडी जाळणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकारने शर्मा यांनाही धक्का बसला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.