मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचे अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा मुलगा अभिनेता आदिनाथ कोठारेचे बनावट फेसबुक अकाऊंट बनविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविरोधात आदिनाथ यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
फेसबुक, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर अभिनेते, अभिनेत्री किंवा प्रसिद्ध व्यक्तींची बनाव फेसबुक खाती बनविण्यात येतात. याद्वारे त्यांच्या मित्रमंडळींकडे पैशांची गजर असल्याचे सांगत पैसे किंवा इतर मदत उकळण्याचे प्रकार सर्रास घडले आहेत. असाच प्रकार अभिनेता आदिनाथ कोठारेच्या बाबतीत घडला आहे.
आदिनाथ कोठारेचा बनावट ई-मेल आयडी बनवून त्याद्वारे फेसबुकवर बनावट खातेही उघडण्यात आले होते. याद्वारे आदिनाथच्या खऱ्या प्रोफाईलवरील मित्रांना या बनावट अकाऊंटद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आल्या. यानंतर त्यांची फसवणूक करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. आदिनाथचे हे खाते खरे वाटावे यासाठी त्याच्या कुटुंबाचेही फोटो या खात्यावर टाकण्यात आले होते. मात्र, परिचितांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांच फसवणूक टळली.
सायबर सेलच्या पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला असून आदिनाथच्या तक्रारीनंतर तपासही सुरु केला आहे. कांदिवली पूर्व येथील समता नगर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला असून तो भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९ आणि ५०० अंतर्गत (फ़सवणूक आणि बदनामी) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६- सी व ६६-डी (खोटी ओळख दाखवून संगणकाच्या माध्यमातून फसवणूक) अंतर्गत नोंदविला गेला आहे.