मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने २०१९ मध्ये कथित बलात्काराप्रकरणी नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याविरोधात जून २०१९ मध्ये वर्सोवा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदविला. मात्र, अद्याप पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले नाही किंवा क्लोजर रिपोर्टही दाखल केलेला नाही, असे आदित्य पांचोलीने याचिकेत म्हटले आहे.
आरोपपत्र दाखल न करणे म्हणजे तपासात काहीही प्रगती नसल्यासारखे आहे, असा युक्तिवाद पांचोलीतर्फे अॅड. अभिनव चंद्रचूड यांनी न्या. नितीन जामदार व न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी केला. आपल्यावर दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा. तसेच पोलिसांनी आत्तापर्यंत तपासात काय प्रगती केली आहे, याची माहिती देण्याचे निर्देश त्यांना दयावेत, अशी मागणी पांचोलीने न्यायालयात केली. न्यायालयाने यासंदर्भात पोलीस आणि तक्रारदार बॉलिवूड अभिनेत्रीला नोटीस बजावत या याचिकेवरील पुढील सुनावणी ९ सप्टेंबर रोजी ठेवली.तपास कोणत्या टप्प्यावर आला आहे, याची माहिती पुढील सुनावणीस द्या, असेही निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले.
२०१९ पासून हे प्रकरण प्रलंबित आहे. एकप्रकारे आदित्य पांचोली यांच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपी म्हणून त्यांच्यावर कलंक लागला आहे, असे चंद्रचूड यांनी म्हटले. बॉलिवूड अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपण बॉलिवूडमध्ये नवीन असताना पांचोलीने आपल्याला ड्रग्सची सवय लावली आणि बलात्कारही केला. पांचोलीने केवळ आपल्याच मारहाण केली नाही तर आपल्या बहिणीलाही मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे.