मुंबई - नवं वर्षानिमित्त मॉडेल आणि अभिनेता राहुल राज सिंगने जुहूतील एका हॉटेलात पार्टी आयोजित केली होती. त्यासाठी राहुलने ते हॉटेल बुक केले होते. मात्र त्याने आयोजित केलेल्या पार्टीतील लोकांनी नियोजनाप्रमाणे तसेच सांगितल्याप्रमाणे बॉलिवूडमधील गायक अंकित तिवारीचा परफॉर्मन्स न झाल्याने हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर हॉटेलमधून सांताक्रुज पोलिसांना फोन आला आणि त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले. हॉटेलचे सहा लाखांचे नुकसान झाले असल्याचे पोलिसांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी पार्टीचा आयोजक असलेल्या राहुल सिंगविरोधात फसवणुकीचा गुन्हा सांताक्रुज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हॉटेल प्रशासनाने पुन्हा सांताक्रुज पोलिसांना राहुलने दिलेले चेक बाउन्स झाल्याप्रकरणी कळविले आहे. राहुलला हॉटेल बुक केल्याने ७ लाख २० हजार इतकी रक्कम द्यायची होती.
३१ डिसेंबरच्या रात्री १२. ३० वाजेपर्यंत जुहूतील एका हॉटेलमध्ये राहुलने पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सामील होण्यासाठी काही लोकांनी पैसे माजून पास विकत घेतले होते. मात्र, या लोकांची हॉटेलात पोचल्यावर पुरती निराशा झाली होती. कारण पासवर नमूद केलेल्या सोयी- सुविधांचा अभाव होता. तसेच बॉलिवूड गायकाचा परफॉर्मन्स देखील नसल्याने भडकलेल्या गर्दीने हॉटेलमध्ये तोडफोड केली होती. याप्रकरणी सांताक्रुज पोलीस ठाण्यात राहुलविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असताना आता १४ डिसेंबर तारखेचा २ लाख ७० हजार आणि २१ डिसेंबर तारखेचा ४ लाख ५० हजार किंमतीचा चेक राहुलने हॉटेल प्रशासनाला दिले होते. मात्र ते बाउन्स झाले असल्याची माहिती हॉटेल प्रशासनाने पोलिसांना दिली. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.