मुंबई - शेजाऱ्याच्या डोक्यात बॉटलने प्रहार करून मारहाण केलेल्या प्रकरणातून अभिनेता विद्युत जामवालची वांद्रे येथील कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे. २००७ साली जुहू येथे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात बॉटलने प्रहार करून मारहाण केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अभिनेता विद्युतसह या गुन्ह्यात सामील असलेल्या त्याचा मित्र हरीश नाथ गोस्वामी याची देखील कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.
१ सप्टेंबर २००७ रोजी रात्री विद्युत त्याच्या मित्रांसोबत जुहू येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार्टी करत होता. हॉटेलमधून बाहेर पडताना राहुल सुरी या व्यावसायिकाचा विद्युतच्या मित्राला अजाणतेपणी धक्का लागला. यावरून जामवालचा मित्र हरिशनाथ गोस्वामी आणि राहुल सुरी यांच्यात बाचाबाची झाली. वाद इतका वाढला की गोस्वामीने सुरी यांच्या डोक्यावर काचेची बाटली फोडल्याचा आरोप केला. पोलिसांच्या चौकशीदरम्यान सुरी यांनी विद्युतनेही त्यांच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं. त्यानंतर याप्रकरणी जामवाल आणि गोस्वामी यांच्याविरोधात खटला सुरु होता.