नागपूर : महानायक अमिताभ बच्चन सोबत त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करीत त्याने चांगली भूमिकाही केली. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे संघाला फुटबॉलचा सामना जिंकता आला. परंतु आयुष्याच्या स्पर्धेत मात्र तो हरला. शानशाैक पुर्ण करण्यासाठी तो चोरीकडे वळला आणि लोहमार्ग पोलिसांच्या तावडीत सापडला.प्रियांशु उर्फ बाबु रवी क्षेत्री (२०) रा. मेकोसाबाग असे त्याचे नाव आहे. त्याला फुटबॉल खेळण्याचा छंद आहे. मात्र वाईट संगतीमुळे तो व्यसनाधीन झाला.
शौक पूर्ण करण्यासाठी चक्क रेल्वेत मोबाईल चोरी करू लागला. शुभम (२०) आणि सत्येंद्र अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत. प्रियांशु हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा आहे. त्याला तीन बहिणी आहेत. वडील मजुरी करतात. प्रियांशु उत्तम फुटबॉल खेळतो. उपराजधानीत पार पडलेल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणात त्याला काम करण्याची संधी मिळाली. तब्बल दोन महिने त्याने काम केले. या चित्रपटात फुटबॉल सामन्याचे दृश्य आहे. फुटबॉल संघात त्याची मुख्य भूमिका होती. प्रियांशुच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांच्या चमूला सामना जिंकला आला. अमिताभ बच्चनसोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाल्याने परिसरात त्याचे अनेक चाहते बनले होते. तो चित्रीकरणाचे अनेक किस्से मित्रांना सांगायचा. त्याला या कामाचे मानधनही मिळाले. असा कलावंत वाईट संगतीकडे वळल्याने अनेकांना दु:ख होत आहे.
रेल्वे स्थानकावर गाडी येण्यापुर्वी आऊटरकडील भागात गाडीचा वेग कमी होतो. अशावेळी प्रवासी प्रवेशद्वारावर उभे राहून मोबाईलवर बोलतात. अशा वेळी प्रियांशु आणि त्याचे साथीदार काठी मारुन प्रवाशांचा मोबाईल खाली पाडायचे आणि मोबाईल घेऊन पसार व्हायचे. अटक केल्यानंतर प्रियांशु आणि त्याच्या साथीदाराकडून ११ मोबाईल जप्त करण्यात आले. तपासात त्याने आपण झुंड चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत काम केले असल्याचे सांगितल्यानंतर लोहमार्ग पोलीस आश्चर्यचकीत झाले. त्यांनी ५ जुलैपर्यंत प्रियांशची पोलीस कोठडी घेतली आहे. पुील कारवाई पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, गुन्हे शाखा यांनी केली. या प्रकरणाचा तपास पोलीस नायक संदिप धंदर करीत आहेत. चांगला कलावंत असूनही वाईट व्यसनामुळे प्रियांशु चोरीकडे वळल्यामुळे त्याच्या परिचीत असलेल्या अनेकांना दुख झाले आहे.