मुंबई - घराच्या बाल्कनीत बसली असताना दोन व्यक्तींनी गुपचूपपणे फोटो काढल्यामुळे वैतागलेल्या अभिनेत्री आलिया भट्टने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरील आपली पोस्ट मुंबई पोलिसांना टॅग करून संबंधितांवर कारवाईची मागणीही आलियाने केली. पोलिसांनी तिला लेखी तक्रार देण्यास सुचवले आहे.
सोशल मीडियावर आलियाने तिच्याबाबतीत घडलेला प्रसंग विदित केला आहे. ती पोस्टमध्ये नमूद करते की, दुपारी मी माझ्या लिव्हिंग रूममध्ये बसले होते. तेव्हा मला कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे, असे वाटले. मी वर बघितले तर शेजारच्या इमारतीच्या छतावर दोन व्यक्ती कॅमेरा घेऊन होेते. ते माझ्या परवानगीशिवाय माझे फोटो काढत असल्याचे निदर्शनास आले. हे कृत्य निंदनीय आहे. अशा प्रकाराला परवानगी आहे का, हे एखाद्याच्या खासगी आयुष्याचा भंग केल्यासारखेच नाही का? पापाराझींनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मुंबई पोलिसांनी कृपया मदत करावी.
सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केल्यानंतर आलियाची बहीण शाहीन भट्ट आणि अभिनेता अर्जुन कपूर यांनी आलियाचे समर्थन केले. अर्जुनने आलियाची इन्स्टाग्राम स्टोरी पुन्हा शेअर केली आणि लिहिले, ‘हा एकदम निर्लज्जपणा आहे. येथे सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत.
सार्वजनिक ठिकाणी तर सोडा आता महिला त्यांच्या घरातही सुरक्षित नाहीत. स्वत:च्या फायद्यासाठी एखाद्या असे फोटो काढणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे माहीत असणे आवश्यक आहे की, असे करणे निंदनीय आहे. हे एखाद्याचा पाठलाग करण्यासारखेच आहे.’ या पोस्टमध्ये त्यानेदेखील मुंबई पोलिसांना टॅग केले आहे.
पोस्टबरोबरच आलियाने फोटोही शेअर केले आहेत. आलियाच्या या पोस्टची दखल घेत खार पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधला, तसेच झाल्या प्रकाराबद्दल लेखी तक्रार नोंदविण्याची विनंतीही केली.