मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशीला सायबर चोरट्यांनी टार्गेट केले आहे . तिच्या क्रेडिट कार्डचा डाटा चोरून आरोपींनी युरोपात त्या पैशांचा वापर केला असल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
अंधेरी सात बंगला परिसरात पल्लवी जोशी या राहतात. ५ जून रोजी पल्लवी या त्यांच्या कार्यालयात काम करत बसल्या असताना त्यांच्या मोबाइलवर एकसारखे मेसेज येऊ लागल्यामुळे त्यांनी मोबाइल पाहिला. तेव्हा मोबाइलवर पाच - सहा मेसेज आले होते. त्यांच्या खात्यातून युरो चलनाद्वारे पैसे काढण्यात आल्याचे ते मेसेज होते. खात्यातून अजून पैसे जाण्याआधीच पल्लवी यांनी बँकेत फोन करून खाते बंद केले. मात्र तोपर्यंत जोशी यांच्या खात्यातून १२ हजार रुपये काढण्यात आले होते. त्यानंतर ६ जून रोजी वर्सोवा पोलीस ठाण्यात पल्लवी यांनी तक्रार दाखल केली. बँकेत केलेल्या चौकशीत हे पैसे युरोपमधील टॅक्सी खर्च आणि खरेदीसाठी वापरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय सायबर चोरांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलिसांनी बँकेकडे या व्यवहाराबाबत माहिती मागवली असून त्या माहितीच्या आधारे पोलीस पुढील तपास करणार आहे.