सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिने पुन्हा एकदा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत आणि ती निर्दोष असल्याचा दावा केला आहे. एका पत्रात रान्या रावनं हा दावा केला आहे. ६ मार्च रोजी लिहिलेलं पाच पानांचं हाताने लिहिलेलं पत्र बंगळुरू येथील एचबीआर लेआउटच्या डीआरआयच्या अतिरिक्त महासंचालकांना लिहिलं आहे. या पत्रात रान्याचा दावा आहे की तिला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं आहे.
रान्या रावने पत्रात लिहिलं आहे की, "मला विमानातच पकडण्यात आलं आणि कोणतंही स्पष्टीकरण न देता अटक करण्यात आली. मला अटक झाल्यापासून ते न्यायालयात हजर होईपर्यंत, मला किमान १०-१५ वेळा कानाखाली मारण्यात आली, त्या अधिकाऱ्यांनी मी ओळखू शकते. त्यांच्यापैकी एकाने सांगितलं की जर मी त्यांनी तयार केलेल्या कागदपत्रांवर सही केली नाही तर ते माझ्या वडिलांचं नाव आणि ओळख उघड करतील जरी ते यात सहभागी नसले तरी. प्रचंड दबाव आणि शारीरिक हल्ल्यामुळे मी ५०-६० टाईप केलेल्या आणि सुमारे ४० कोऱ्या पानांवर सही केली आहे."
"डीआरआय कोठडीत मला नीट झोपू किंवा जेवू दिलं जात नव्हतं. मी निर्दोष आहे आणि मला खोट्या आरोपात अडकवण्यात आलं आहे. दावा केल्याप्रमाणे कधीही माझी झडती घेण्यात आली नाही किंवा माझ्याकडून काहीही जप्त करण्यात आलं नाही. दिल्लीतील काही अधिकारी स्पष्टपणे इतर प्रवाशांना वाचवू इच्छितात आणि मला अडकवू इच्छितात. माझ्या अटकेपासून ते न्यायालयात हजर होईपर्यंत नोंदवलेल्या कोणत्याही जबाबावर विश्वास ठेवू नये अशी माझी विनंती आहे." रान्या रावला ३ मार्च रोजी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून बंगळुरूला येत असताना १२.५६ कोटी रुपयांच्या १४ किलो सोन्यासह अटक करण्यात आली होती.
दुबईहून दरवेळी १५ किलो सोनं आणून किती कमाई करायची रान्या राव?, झाला धक्कादायक खुलासा
रान्याने यापूर्वीही अनेकदा तस्करी केली होती, असं सांगितलं जात आहे. परंतु यावेळी एजन्सीकडे ठोस माहिती होती. डीआरआयच्या या कारवाईमुळे सोन्याच्या तस्करीत सहभागी असलेल्या इतर अनेक नावांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या रॅकेटशी संबंधित आणखी लोकांची ओळख पटवली जात असून लवकरच अनेक मोठे खुलासे होऊ शकतात, असं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. अभिनेत्रीने २०१४ मध्ये 'माणिक्य' या कन्नड चित्रपटातून पदार्पण केलं आणि नंतर 'वगाह' आणि 'पटकी' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं, परंतु अचानक ती इंडस्ट्रीतून गायब झाली.