कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला काही दिवसांपूर्वी बंगळुरू विमानतळावर १४.८ किलो सोन्यासह अटक करण्यात आली होती. डीआरआयचे वकील मधु राव यांनी सत्र न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, रान्या रावने चौकशीदरम्यान कबूल केलं आहे की, सोनं खरेदी करण्यासाठीचे पैसे हवालाद्वारे (Hawala) पाठवले गेले होते.
रान्या रावच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान, डीआरआयचे वकील मधु राव म्हणाले की, अधिकाऱ्यांनी अभिनेत्रीविरुद्ध न्यायालयीन चौकशी सुरू करण्यासाठी कलम १०८ अंतर्गत नोटीस बजावली आहे. तिचा जामीन अर्ज आतापर्यंत दोनदा फेटाळण्यात आला आहे. पहिल्यांदा कनिष्ठ न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता आणि नंतर दुसऱ्यांदा आर्थिक गुन्ह्यांच्या विशेष न्यायालयानेही जामीन मंजूर केला नाही.
सत्र न्यायालयाने दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकले आहेत आणि २७ मार्चपर्यंत आपला निकाल राखून ठेवला आहे. ३ मार्च रोजी अभिनेत्री रान्या रावला बंगळुरूतील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी अभिनेत्रीकडून १२.५६ कोटी रुपयांचे सोन्याची बिस्किटं जप्त केली. त्यानंतर तिच्या घराची झडती घेतली असता २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हवालाचा पैसा म्हणजे काय? अभिनेत्री रान्या रावने दुबईत कसा वापरला?
रान्याची भारत ते दुबई ट्रॅव्हल हिस्ट्री धक्कादायक आहे. रोज नवनवीन खुलासे होत आहेत. रान्या सोनं आणताना खास ड्रेस कोड करायची असं समोर आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) अभिनेत्रीच्या सोन्याच्या तस्करीच्या कारवाया उघड करण्यासाठी तिच्या ट्रॅव्हल पॅटर्नची चौकशी करत आहे. भारतातील ज्या विमानतळांवरून रान्या रावने प्रवास केला आहे त्या विमानतळांची संपूर्ण माहिती अधिकारी गोळा करत आहेत. आतापर्यंतच्या तपासात असं समोर आलं आहे की, २०२० पासून आतापर्यंत रान्याने ९० वेळा परदेश प्रवास केला आहे. तिने बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ६० वेळा प्रवास केला आहे.