पब्जीच्या नादानं आयुष्याचा 'खेळ'; पाण्याऐवजी अॅसिड प्यायल्यानं तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 09:50 PM2019-12-12T21:50:29+5:302019-12-12T21:51:25+5:30
सौरभ यादव आणि संतोष शर्मा हे दोन युवक स्वर्ण जयंती एक्सप्रेस ट्रेनने आग्र्याला चालले होते.
मध्य प्रदेश - पबजी गेम खेळण्याच्या नादात एक २० वर्षीय तरुण पाणी समजून अॅसिड प्यायला. मध्य प्रदेशात भोपाळमध्ये ट्रेन प्रवासादरम्यान ही धक्कादायक घटना घडली. सौरभ यादव आणि संतोष शर्मा हे दोन युवक स्वर्ण जयंती एक्सप्रेस ट्रेनने आग्र्याला चालले होते. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली. याबाबत माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
संतोष शर्मा याचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. त्यामुळे दागिने साफ करण्यासाठी अॅसिडची गरज लागते म्हणून त्याने बागेतून अॅसिडची बाटली घेतली होती. ट्रेनमध्ये ग्वाल्हेर येथे राहणाऱ्या सौरभ यादव हा गेम खेळण्यात गुंग झाला होता. त्याने कानाला हेडफोन्स लावले होते. सौरभला तहान लागलेली होती त्यावेळी त्याने खेळण्याच्या नादात शर्माच्या बॅगेतून अॅसिडची बाटली काढली आणि पाणी समजून तो अॅसिड प्राशन केले. जास्त प्रमाणात अॅसिड पोटात गेल्याने आणि ताबडतोब वैद्यकीय उपचार न मिळाल्याने सौरभच्या मृत्यू झाला.
ट्रेन ढोलपूर येथे थांबत नसल्यामुळे सौरभला वेळेत योग्य उपचार मिळू शकले नाहीत. ट्रेन आग्र्याला पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. शर्माने आपण ज्वेलर्स असून आग्र्याच्या सराफा बाजारमध्ये आपले नेहमी येणे - जाणे सुरु असते असे पोलिसांना सांगितले. रेल्वे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. सौरभच्या कुटुंबाने संतोष शर्मावर जाणूनबुजून अॅसिड पाजल्याचा आरोप केला आहे.