जळगाव : आधी मंदिराचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून तुमचा डबल फायदा करून देतो असे सांगत दोन चोरट्यांनी वत्सला सुभाष चौधरी (६८, रा.गुरूदत्त कॉलनी) या महिलेची १० हजार रूपये किंमतीची मंगलपोत लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनी परिसरातील गुंजन खरेदी-विक्री केंद्रासमोर घडली. याप्रकरणी वृध्द महिलेच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
वत्सला चौधरी या सोमवारी सकाळी रिंगरोग येथे त्यांच्या औषधी घेण्यासाठी आल्या होत्या. औषधी घेवून पुन्हा घराकडे निघाल्या असता, त्या रिक्षातून गणेश कॉलनी परिसरातील गुंजन खरेदी-विक्री केंद्राजवळ उतरल्या. त्यावेळी दोन व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. त्यांनी इथे मारूती मंदिर कुठे आहे, अशी विचारणा केली. चौधरी यांनी इथे मारूती नाही, दत्त मंदिर आहे, असे सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी तुमचा डबल फायदा करून देतो सांगून चौधरी यांच्याजवळील मंगलपोत मागितली. त्यानंतर ती एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून त्यांना परत करत तुम्ही ही पुडी घरी गेल्यावर उघडा असे सांगितले. चौधरी यांनी घरी आल्यावर पुडी उघडून पाहिल्यानंतर त्यांना त्यांची १० हजार रूपये किंमतीची मंगलपोत गायब झालेली दिसून आली. त्यावेळी त्यांना आपली पोत चोरट्यांनी लांबविल्याची खात्री झाल्यावर त्यांनी संपूर्ण हकीकत मुलाला सांगितली. त्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार दोन्ही चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.