भोपाळ: दिवसभर शिंपी म्हणून काम करणारा आदेश खामरा एक सीरियल किलर असेल याची कल्पनादेखील कोणी केली नव्हती. दिवसा कपडे शिवणारा आदेश रात्री अनेकांच्या हत्या करायच्या. मध्य प्रदेशसह ६ राज्यांत त्यानं ३३ जणांचे खून केले. दिवसभर कपडे शिवणारा आदेश असं काही करेल असं त्याच्या कुटुंबीयांनादेखील वाटलं नव्हतं. अतिशय थंड डोक्यानं ३३ जणांना संपवणारा आदेश सध्या तुरुंगात आहे. त्याचे साथीदारदेखील गजाआड आहेत.
दहा वर्षांपूर्वी अमरावती, नाशकात अचानक काही ट्रक चालक आणि क्लीनर्सच्या हत्या झाल्या. त्यानंतर असेच प्रकार मध्य प्रदेशात घडू लागले. पुढे अशाच प्रकारचे गुन्हे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये घडले. सर्व राज्यांचे पोलीस गुन्हेगाराचा शोध घेत असताना त्यांना काही समान धागे हाती लागले.
एका पाठोपाठ होत असलेल्या हत्या वाहतूक क्षेत्राशी संबंधित लोकांच्या असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. प्रकरणांचा तपास सुरू झाला. हा तपास भोपाळच्या मंडीदीप येथे वास्तव्यास असलेल्या आदेश खामरापर्यंत पोहोचल्या. सुरुवातीला त्यानं आपल्याला काहीच माहीत नसल्याचं पोलिसांना सांगितलं. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं धक्कादायक खुलासे केले. ते ऐकून पोलीसदेखील चक्रावले. आपल्या टोळीच्या मदतीनं ६ राज्यांत ३३ जणांचा खून केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये रायसेन येथील माखन सिंह ट्रकमध्ये सळया भरून निघाला होता. आदेश आणि त्याच्या टोळीनं त्याची हत्या केली. माखन सिंहचा ट्रक भोपाळजवळ सापडला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी खामराचा सहकारी असलेल्या जयकरणच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर या प्रकरणात आदेशसह ९ जणांना अटक झाली. सुलतानपूरच्या जंगलात आदेश खामरा बेड्या ठोकण्यात आल्या.
आदेशला सर्व हत्या तारखेनिशी माहीत होत्या. याबद्दल कोणताच पश्चाताप नसल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. ६ राज्यांमध्ये ३३ हत्या केल्याची माहिती त्यानं दिली. आदेश आणि त्याच्या टोळीतील सहकारी ट्रक चालक आणि क्लीनर्ससोबत ढाब्यांवर मैत्री करायचे. त्यानंतर त्यांची हत्या करून त्यांना लुटायचे. हत्येनंतर त्यांच्या ट्रकमधील सामान विकून टाकायचे.