नवी दिल्ली – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आणखी एक स्टडी रिपोर्ट समोर आला आहे. ट्विटर, युट्यूब व्हिडीओ आणि ट्रेड्सच्या माध्यमातून हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. यात काही नेते, पत्रकार आणि मीडिया हाऊसने स्वत:च्या फायद्यासाठी सुशांत सिंह राजपूत 'मर्डर थियरी' वापरली असं सांगितलं आहे. हा रिपोर्ट मिशिगन विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापकांच्या नेतृत्वात संशोधकांच्या टीमने केला आहे.
रिपोर्टनुसार पूर्णपणे निराधार हत्येच्या थेअरीस प्रोत्साहन देणार्या कन्टेन्टला जास्त ट्रॅक्शन मिळाले. "Anatomy of a Rumors: Social Media and Suicide of Sushant Singh Rajput" या शीर्षकातील स्टडी सांगते की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नेत्यांच्या अकाऊंटवरुन हे आत्महत्येपासून हत्येच्या थिअरीत बदलले गेले, रिपोर्टमध्ये सुमारे ७ हजार यूट्यूब व्हिडिओ, १० हजार ट्विटचे विश्लेषण केले होते, जे सुमारे २ हजार पत्रकार आणि मीडिया हाऊसेस आणि १,२०० राजकारण्यांशी जोडले गेले होते.
सुशांत आत्महत्येला हत्येचं वळण
रिपोर्टनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात, विशेषत: राजकारण्यांनी सुशांत सिंहची आत्महत्या नसून हत्या आहे सांगत याला वेगळं वळण दिलं, यानंतर माध्यमांनीही हे काम केले. राजकीय नेत्यांनी जुलै महिन्यात सुशांत आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली तर ऑगस्टच्या सुरुवातीपासून पत्रकारांनी महाराष्ट्र सरकारविरोधात या प्रचाराला पूर्ण ताकदीनं पुढे नेलं.
रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, सलमान खान टार्गेट
या संपूर्ण मोहिमेतील रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, दिशा सालियन आणि सलमान खान यांना सर्वात जास्त टार्गेट केले गेले. रिपोर्टचे नेतृत्व करणारे मिशिगन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जॉयजीत पाल यांनी सांगितले की, यात ऑनलाईन एगेंजमेंटर असण्याची शक्यता फारच कमी आहे. संपूर्ण सोशल मीडिया स्पेस इतकी प्रभावीपणे सज्ज केली की, भावनिक पैलू असलेल्या कोणत्याही विषयावर संपूर्ण देश एकवटू शकतो. वास्तविक जीवनातील कथेच्या आधारे काही स्वारस्य गटांनी ऑनलाइन नेरेटिव्हवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. आमच्या टीमने माध्यम, पत्रकार आणि राजकारणी यांच्याद्वारे केलेल्या कन्टेन्टचं विश्लेषण केले आहे, कारण ऑनलाइन जगतात या लोकांकडून जबाबदारीने वागावे अशी अपेक्षा केली जाऊ शकते.
'मर्डर' या शब्दाचा वापर
'मर्डर' या शब्दाचा वापर करण्यात भाजपाशी संबंधित खाती अधिक आक्रमक असल्याचे या रिपोर्टमध्ये आढळले आहे. "या डेटावरून असे दिसून आले आहे की राजकारण्यांनी, विशेषत: भाजपाशी संबंधित असलेल्यांनी सुशांतची आत्महत्या ऐवजी हत्या असल्याचं बिंबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
८० हजार बनावट सोशल अकाउंटवर गुन्हा; सायबर सेलची कारवाई
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर तयार करण्यात आलेल्या ८० हजार बनावट अकाऊंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुकवरच्या अकाउंट्सचा समावेश आहे. लवकरच या कटामागील आरोपींवर कारवाई करणार असल्याचे सायबर पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले. या बनावट अकाउंटवरून मुंबई पोलिसांची बदनामी, शिवीगाळ करण्यात येत होती. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्तालयाच्या नावेही बनावट अकाउंट काढले होते. काही वृत्तसंस्थांनीही चुकीच्या पद्धतीने तपास दाखवून पोलिसांची बदनामी केली. त्याविरुद्ध काही निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालय योग्य भूमिका घेईल, असे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले आहे.