वास्को: दक्षिण गोव्याच्या वास्को शहरातील साईबाबा मंदिराच्या बाजूतील पदपथावरून एका ११ महिन्याच्या बाळाचे (मुलगा) अपहरण केलेल्या प्रकरणात वास्को पोलीसांनी २४ तासाच्या आत छडा लावून बाळाला सुखरूपरित्या आपल्या ताब्यात घेतला. दिपक यादव उर्फ लंगडा आणि प्रमिला उर्फ काण्या असे दोन संशयित आरोपी त्या बाळाचे अपहरण करून त्याला मुंबईला घेऊन गेल्याची माहीती पोलीसांना मिळताच गुरूवारी वास्को पोलीसांचे पथक मुंबईला रवाना झाल्यानंतर २४ तासाच्या आत त्यांनी त्या बाळाचा शोध लावला. माहीम, मुंबई येथून पोलीसांनी त्या बाळाला सुखरूपरित्या ताब्यात घेण्याबरोबरच त्याचे अपहरण केलेल्या दिपक आणि प्रमिला ह्या दोन्ही संशयित आरोपींच्या मुसक्या आवळून नंतर त्यांना घेऊन ते मुंबईहून गोव्याला येण्यासाठी रवाना झाले. शुक्रवारी (दि.१३) रात्री ११ पर्यंत ते वास्को पोलीस स्थानकावर पोचणार असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली.
वास्को शहरात असलेल्या साईबाबा मंदिराजवळील पदपथावरून ११ महिन्याच्या त्या बाळाचे बुधवारी (दि.११) पहाटे अपहरण झाले होते. त्या बाळाचे कुटूंब भिक मागून उदरनिर्वाह करत असल्याची माहीती पोलीसांकडून प्राप्त झाली होती. रात्रीच्या वेळी ते कुटूंब बाळासहीत साईबाबा मंदिराजवळील पदपथावर झोपले होतो. बुधवारी पहाटे जेव्हा त्या बाळाचे कुटूंब उठले त्यावेळी त्यांना बाळ गायब असल्याचे आढळून आले. त्यांनी नंतर संपूर्ण वास्कोत बाळाचा शोध घेतला, मात्र तो त्यांना सापडला नाही. अखेरीस गुरूवारी बाळाच्या आईने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. भिक मागून उदरनिर्वाह करणारे आणि त्याच पदपथाच्या एका बाजूत झोपणारे दिपक यादव आणि काण्या यांनी बाळाचे अपहरण केले असावे असा संशय आईने तेव्हा पोलीसांसमोर व्यक्त केला होता. बाळाच्या अपहरण प्रकरणात पोलीसांनी त्वरित चौकशीला सुरवात केली असता पदपथावरच झोपणारे दोन व्यक्ती (एक पुरूष आणि एक महीला) त्या बाळाला घेऊन मुंबईला रवाना झाल्याची खात्रीलायक माहीती त्यांना प्राप्त झाली. त्याबाबत माहीती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक गुरूदास कदम आणि पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांनी त्या बाळाची त्वरित सुखरूपरित्या सुटका करण्यासाठी पावले उचलली. गुरूवारीच पोलीस हवालदार आशिष नाईक, पोलीस हवालदार सचिन बांदेकर, महीला पोलीस शिपाई रवीना शहापुरकर आणि पोलीस चालक सनील बावालेकर यांचे खास पथक तयार करून वाहनाने ते रस्ता मार्गे मुंबईला जाण्यासाठी रवाना झाले.
मुंबईला पोचल्यानंतर वास्को पोलीस पथकाने महाराष्ट्र पोलीसांच्या सहकार्याने माहीम, मुंबई येथे बाळाला घेऊन पोचलेल्या त्या संशयित आरोपींचा शोध लावून त्यांना गजाआड करण्याबरोबरच ११ महीन्याच्या बाळाला सुखरूपरित्या आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर मुंबईला गेलेले वास्को पोलीसांचे पथक ११ महीन्याच्या बाळाचे अपहरण केलेले संशयित आरोपी दिपक उर्फ लंगडा आणि प्रमिला उर्फ काण्या ह्या संशयित आरोपी आणि बाळाला घेऊन वास्को पोलीस स्थानकावर येण्यासाठी निघाले. शुक्रवारी रात्री ११ पर्यंत ते बाळाला आणि गजाआड केलेल्या संशयित आरोपींना घेऊन वास्को पोलीस स्थानकावर पोचण्याची शक्यता आहे.
जावयाने कोयत्याने केली सासूसह मेव्हणीची हत्या, संपत्तीच्या वादातून घडला प्रकार
पोलीसांनी ११ महीन्याच्या त्या बाळाच्या अपहरण प्रकरणात संशयित आरोपी दिपक आणि काण्या यांच्याविरुद्ध भादस ३६३ आरडब्ल्यु ३४ आणि गोवा बाल कायद्याच्या ८ कलमाखाली गुन्हा नोंद केला असल्याची माहीती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अभिषेक धानिया यांच्याकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे प्राप्त झाली. पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत मांर्देकर ह्या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.