बीड : सोलापूरहून औरंगाबादकडे ट्रकमधून नेला जाणारा ४५ लाख रुपयांचा गुटखा दरोडा प्रतिबंधक पथकाने गुरुवारी पकडला. ही कारवाई सकाळी १० वाजता बीड बायपासवर रामनगरजवळ करण्यात आली. यामध्ये ट्रकसह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षकांच्या पथकाने गेवराई तालुक्यातील पाडळशिंगीजवळ बुधवारी ३७ लाख रुपयांचा गुटखा पकडला होता. याचा पंचनामा होत नाही तोच गुरुवारी सकाळी १० वाजता एडीएसने बीड बायपासवर तब्बल ४५ लाख रुपयांचा गुटखा पकडला. सोलापूर येथून औरंगाबादकडे एका ट्रकमधून (एमएच २४ जे ६२३७) नेला जात असल्याची माहिती सपोनि गजानन जाधव यांना मिळाली. त्यांनी पथकासह बीड बायपासवर सापळा लावला. ट्रक अडविल्यानंतर चालकाला विचारपूस केली. परंतु त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. चालकासह साथीदाराला ताब्यात घेऊन बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. गुटखा वाहतुकीसाठी वापरलेला १० लाख रुपये किंमतीचा ट्रकही ताब्यात घेतला आहे. उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन जाधव, अभिमन्यू औताडे, भारत बंड, राजाभाऊ नागरगोजे, मुंजाबा सौंदरमल, राहुल शिंदे, महेश चव्हाण, हरिभाऊ बांगर, अंकुश दुधाळ, नारायण साबळे यांनी केली.