जळगाव: जळगाव प्रथमवर्ग न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत (३५, रा. सुपारीबाग, जामनेर) यांच्या खून प्रकरणात पती डॉ. भरत लालसिंग पाटील यास जन्मठेप तर व सासरे लालसिंग श्रीपत पाटील (७४, रा. बेलखेडे, ता. भुसावळ) यांना न्यायालयाने चार वर्षे कैदेची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी गुरुवारी हा निकाल दिला. नातेवाईकांनी दिलेल्या साक्षी, मोबाईल सीडीआर व फाॅरेन्सिक अहवाल यात महत्त्वाचा ठरला आहे.ॲड. विद्या राजपूत यांचा १३ जानेवारीला उशीने तोंड व गळा दाबून खून झाला होता. पती डॉ. भरत लालसिंग पाटील व सासरे लालसिंग श्रीपत पाटील यांना या गुन्ह्यात अटक केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून पती कारागृहात होता तर सासरा लालसिंग पाटील हे जामिनावर होते. निकालानंतर न्यायालयाने दोघांना अटक करण्याचे आदेश दिले.
संशयात्मा विनश्यति। निकाल देताना न्यायालयाने संशयात्मा विनश्यति। या गीतेतील वचनाचा संदर्भ दिला. संशय आला की विनाश होतो, असे पती डॉ. भरत यास सुनावले. विद्या राजपूत मोबाइलवर बोलत असत. त्यांच्या चारित्र्यावर पतीकडून सतत संशय घेतला जात होता, असे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी न्यायालयात सांगितले. या खटल्यात १९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यापैकी १४ साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.