ठाणे: बेकायदेशीर रित्या दक्षिण आफ्रिकेतील (परदेशी) वाईनचा साठा करणाऱ्या भिवंडी, शेलारगाव येथील रमेंद्रकुमार रमाकांत तिवारी (४८) आणि नंदिनाका परिसरातील रियाज अली आबिद (५५) या दोष्घांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभाग भरारी पथकाने अटक केली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून अफ्रीकन निर्मितीच्या ५५ लाख २२ हजार ४०० रुपयांच्या ७५० मिलीच्या पाच हजार २८८ वाईनच्या बाटल्यांचा साठा जप्त केल्याची माहिती उत्पादन शुल्कचे ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी बुधवारी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, कोकण विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि ठाण्याचे अधीक्षक डॉ. सांगडे यांनी परदेशातील अवैध मद्याविरुध्द कारवाई करण्यासाठी भरारी पकाला आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर भिवंडीतील एका गोदामात अफ्रीकन वाईनचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली.
भिवंडीच्या अनगाव, वाडा रोडवरील ध्वनी कॉम्पलेक्समधील शॉप क्रमांक २०४, २०५ आणि २०६ याठिकाणी हा वाईनचा अवैध साठा असल्याची ही माहिती मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे १० ऑक्टोबर २०२३ रोजी भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे आणि दुय्यम निरीक्षक विजय धुमाळ तसेच जवान हनुमंत गाढवे, नारायण जानकर, केतन वझे, संपत वनवे, नानासाहेब शिरसाठ, विजय पाटील आणि सागर चौधरी आदींपी छापा टाकत ही कारवाई केली. यावेळी मोठया प्रमाणात परदेशातील वाईनच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
ही वाईन दक्षिण आफ्रिकेतील असून त्याच्या उत्पादन प्रिंट २०१४ असा उल्लेख आहे. अटकेतील दोघे गोदामाचे चालक आहेत. विक्री न झाल्याने ही वाईन गोदामात चार ते पाच वर्षांपासून ठेवण्यात आली होती. ती कोणी आणि केंव्हा मागवली होती तसेच कोणाला विकण्यात येणार होती. तिची का विक्री झाली नाही. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध सुरू केला आहे.- डॉ. निलेश सांगडे, अधीक्षक, विभाग,राज्य उत्पादन शुल्क, ठाणे.