नवी दिल्ली :
श्रद्धा वालकर ही अन्य एका मित्राला भेटण्यासाठी गेली होती. ते आफताब पूनावाला याला आवडले नाही आणि तो संतप्त झाला. त्या भरातच त्याने श्रद्धाला ठार मारले, असे दिल्ली पोलिसांनी मंगळवारी स्पष्ट केले. या प्रकरणात पोलिसांनी साकेत न्यायालयात आफताब याच्याविरुद्ध ६६२९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
आफताब याने गतवर्षी आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर त्याने मृतदेहाचे ३५ तुकडे करुन शहराच्या विविध भागात टाकल्याचा आरोप आहे. हा खटला पुढे चालून आता आफताबला शिक्षा होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
१५० जणांचे जबाब - संयुक्त पोलिस आयुक्त (दक्षिण) मीनू चौधरी यांनी सांगितले की, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रद्धा ही आपल्या अन्य एका मित्राला भेटण्यासाठी गेली होती. - ते आफताब याला आवडले नाही. त्यानंतर तो प्रचंड संतापला आणि या संतापाच्या भरात त्याने श्रद्धाला ठार मारले. - पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी भादंविच्या कलम ३०२ आणि २०१ नुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात १५० पेक्षा अधिक लोकांचे जबाब आहेत.
न्यायालयीन काेठडीत वाढ- पोलिसांनी हे आरोपपत्र मंगळवारी दाखल केले. त्यानंतर आफताबच्या न्यायालयीन कोठडीत दोन आठवड्यांची वाढ करुन ७ फेब्रुवारीपर्यंत कोठडी वाढविण्यात आली आहे. - मंगळवारी न्यायालयीन कोठडीचा कालावधी संपल्यानंतर आफताब यास व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आले होते.