नवी दिल्ली: लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याप्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला दिल्ली कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देत त्याच्या पॉलिग्राफ चाचणीस परवानगी दिली. आज आफताबची पॉलिग्राफ चाचणी होण्याची शक्यता आहे. पॉलीग्राफ चाचणीमुळे आरोपीकडून सत्य बाहेर येण्यास मदत होईल, अशी आशा पोलिसांना आहे.
पॉलिग्राफ चाचणी पूर्वी होणारी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून आज आफताबची पॉलिग्राफ चाचणी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चाचणीआधी त्याला एका लॅबमध्ये पोलीस घेऊन गेले होते. त्यावेळीचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये तो हातावर हात ठेऊन, मास्क लावून आणि चेहऱ्यावर अजूनही राग असल्यासारखा उभा आहे.
श्रद्धाचा मृत्यू होण्याच्या काही तासांपूर्वी तिने तिच्या मित्राला मेसेज केला होता. ती चॅट आता समोर आली आहे. श्रद्धाने १८ मे रोजी सायंकाळी मित्राला मेसेज केला होता. परंतु ही शेवटची चॅट असेल, असं श्रद्धानेही विचार केला नसेल. श्रद्धाने मित्राला मेसेज करुन म्हटलं होतं की, 'I Have Got News' म्हणजेच 'माझ्याकडे एक माहिती आहे'. श्रद्धाने यानंतर आणखी एक मेसेज केला आहे, त्यामध्ये 'मी एक गोष्टीमध्ये खूप व्यस्त आहे', असंही म्हटलं आहे. मात्र या मेसेजवरुन श्रद्धाला काहीतरी सांगायचे होते, असं दिसून येत आहे.
आफताबचा जबाब अन् संपूर्ण यंत्रणा कामाला लागली; अख्खा तलाव रिकामा केला, पण...
श्रद्धाने स्वहस्ते लिहिलेली पोलिस तक्रारीची प्रत बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. नोव्हेंबर २०२० मध्ये तुळींज पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीमध्ये ‘आफताब आपणास सहा महिन्यांपासून मारहाण करीत असून, त्याने आपल्या शरीराचे तुकडे करून फेकून देईन,’ अशी धमकी दिली असल्याचे नमूद आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये श्रद्धाला आफताबने एव्हरशाईन - वसई येथे राहत असताना गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांनी अर्ज देण्यास सांगून मेडिकल करून येण्यास सांगितले होते. पण, तिने याकडे कानाडोळा केला.
पत्रावर कारवाई का झाली नाही याचा तपास होणार- फडणवीस
श्रद्धा वालकर हिने २०२० मध्ये लिहिलेल्या पत्रासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. श्रद्धाचे पत्र मी पाहिले. त्या पत्रावर कारवाई का झाली नाही, याचा तपास केला जाईल. या पत्रावर वेळेत कारवाई झाली असती तर कदाचित आज श्रद्धाचे प्राण वाचू शकले असते, असेही ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"