मुंबई : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याची प्रकृती ठीक नसल्याने रखडलेली पॉलिग्राफ चाचणी गुरुवारी पार पडली. मात्र, त्याला सर्दी झाल्याने, सतत शिंका येत असल्याने ती पूर्ण होऊ शकली नाही. ती शुक्रवारी पुढे सुरु राहिली. कदाचित उद्याही ही चाचणी केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चाचणीत आफताबने त्याच्या आणि श्रद्धाच्या संबंधांबाबत थोडी परस्परविरोधी माहिती दिल्याने सोमवारच्या चाचणीतील त्याच्या उत्तराकडे लक्ष लागले आहे. आफताबच्या चाचणीसाठी पाचजणांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यात दोन मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश आहे, तर दोघे त्याच्या चाचणीच्या तपशीलवार रेकॉर्डिंगवर लक्ष ठेवत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी गोळा केलेले पुरावे, त्याने श्रद्धाचा खून केला कसा, का केला, कशासाठी केला, दोघांच्या नात्यात नेमके काय घडले होते, त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, त्यासाठी कोणती अवजारे वापरली, मृतदेहाचे तुकडे-तिचा मोबाइल कुठे फेकला, हत्येनंतरही काळ काळ सोशल मीडियावर ती जिवंत असल्याचे कसे भासवले, यावर आधारित जवळपास ५० प्रश्न या टीमने काढले आहेत. त्यातील २० - २२ प्रश्न गुरुवारी विचारले. उरलेले प्रश्न सोमवारी विचारले जातील. या चाचणीच्या वेळी आफताबने शांतपणे उत्तरे दिली. त्याच्यावर कोणताही ताण नव्हता, तो शांतपणे चाचणीला सामोरा गेला.
बद्रीही संशयाच्या भोवऱ्यातछत्तरपूर पहाडीच्या जंगलात आडबाजूला आफताबला घर भाड्याने देणारा त्याचा मित्र बद्रीही संशयाच्या भोवऱ्यात असून, पोलिस त्याची चौकशी करणार आहेत. याच घराजवळच्या जंगलाच्या भागात श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले होते. आफताब आणि श्रद्धाची हिमाचल प्रदेशात ब्रदीशी ओळख झाली होती. त्यानंतर ब्रदीने आफताबला घर भाड्याने दिले होते. त्याला हत्येची कल्पना होती, त्याचा सहभाग आहे का याबाबत चौकशी होणार आहे.