मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची बहीण हसीनाचा पती इब्राहिम पारकरचा १९९१ साली अरुण गवळी गॅंगने गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्याकांडातील जामीन मिळाल्यानंतर फरार झालेला आरोपी २२ वर्षांनी मुंबई गुन्हे शाखेच्या तावडीत सापडला आहे. इस्माईल पारकरच्या हत्येप्रकरणी फरार आरोपी दयानंद सॅलियन उर्फ पुजारीला (वय ४९) मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने कांजूरमार्ग येथून बेड्या ठोकल्या आहेत.
हसीनाचा पती इब्राहिम पारकरची १९९१ साली दाऊद आणि अरुण गवळी या दोन गॅंगच्या वादातून गवळी गँगच्या चौघांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर पुजारी आणि दुसरा साथीदाराने पळ काढला. मात्र, नागरिकांनी शैलेश हळदणकर आणि बिपीन शेरे या दोन शूटर्सना पकडून पोलिसांकडे दिले. त्यानंतर यांच्या चौकशीतून पोलिसांनी पुजारील अटक केली. दरम्यान १९९६ साली पुजारील जामीन मिळाला आणि तो मुंबई सोडून उत्तर प्रदेशात फरार झाला. झाशी येथे हॉटेल आणि ढाब्यांवर पुजारी गेल्या २२ वर्षांपासून आचारी (कुक) म्हणून काम करत होता. गेली २२ वर्ष तो आपल्या कुटुंबापासून दूर होता. पुजारी मुंबईतील कांजूरमार्ग परिसरात आपल्या कुटुंबाला भेटायला येणार असल्याची खबर त्याच्या संपर्कात असलेल्या जुन्या मित्रांना आणि खबऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी रात्री कांजूरमार्ग येथे सापळा रचला आणि त्याला बेड्या ठोकल्या. गुन्हे शाखेचे अधिकारी सतीश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. २२ वर्ष पुजारी हा त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात देखील नसल्याने त्याचा माग काढणं खूप अवघड असल्याचे गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.