धीरज परब
मीरारोड - १९९४ साली मीरारोडच्या पेणकरपाडा भागात तीन तरुणांनी क्षुल्लक वादातून शेजारी राहणाऱ्या महिलेसह तिच्या ४ चिमुरड्यांची चॉपर व चाकूने वार करून निर्घृण हत्या केली होती. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या भयावह अशा ५ जणांच्या हत्याकांडातील एका आरोपीस तब्बल २८ वर्षांनी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. आणखी दोन आरोपींचा पोलीस शोध घेत असून अटक आरोपीला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेणकरपाडा मधील भारवाड चाळीत राजनारायण शिवचरण प्रजापती ( त्यावेळचे वय २९ वर्ष ) हे पत्नी जगराणीदेवी (२७ ), ५ वर्षांचा मुलगा प्रमोद, साडेतीन वर्षांची मुलगी पिंकी, २ वर्षांचा मुलगा चिंटू आणि ३ महिन्याचा मुलगा असे रहात होते . राजनारायण हे नजीकच्या किराणा दुकानात काम करायचे. ते मूळचे उत्तर प्रदेशच्या इलाहाबादमधील होते. त्याच चाळीत प्रजापती यांच्या समोरच्या खोलीत साहबलाल अमरनाथ चौहान ऊर्फ काल्या ऊर्फ साहेब ऊर्फ राजकुमार ( त्यावेळी वय १९ वर्ष ) हा सुनिल रामअवैध ऊर्फ सरोज आणि अनिल रामअवैध ऊर्फ अवधु सरोज हे दोघे भाऊ असे तिघेजण राहायचे.
जगराणीदेवी हिच्याशी बळजबरी करण्यासाठी अनिलच्या मोठ्या भावाने तिचा हात धरला होता. त्यावरून त्याने भांडण झाले होते. तर जगराणीदेवी हिचे लहान मुलं आरोपींच्या आरोपींच्या घरात जाऊन खेळायची त्यावेळी त्यांची सुटकेस तुटली होती. त्यावरून भांडण होऊन प्रजापती यांनी त्यांना नवीन सुटकेस आणून दिली होती. मात्र भांडणाचा राग ५ जणांच्या हत्येस कारणीभूत ठरेल असे कोणाला वाटले नव्हते.
१६ नोव्हेंबर १९९४ रोजी दुपारी पावणेचार ते रात्री ११ दरम्यान राजकुमार, सुनिल व अनिल यांनी प्रजापती यांच्या घरात घुसून जगराणीदेवी सह तिच्या चारही चिमूरड्यांची चॉपर व चाकूने वार करून निर्दयीपणे हत्या केली होती. ५ जणांची हत्या केल्यानंतर त्यांच्या घराला बाहेरून टाळे मारले. हत्येसाठी वापरलेली हत्यारे व रक्ताने माखलेले कपडे त्यांनी स्वतःच्या खोलीत लपवून ठेवत ते पळून गेले होते. या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात ह्या हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला होता. मात्र आरोपींच्या मिळालेल्या उत्तर प्रदेश मधील पत्त्यांवर ते सापडले नव्हते.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय झाल्यावर २०२० साली तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते व गुन्हेशाखेचे उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी शहरातील सर्वात मोठ्या व भयाण अश्या ह्या हत्याकांडाचा गुन्हा इतकी वर्ष होऊन सुद्धा उघडकीस न आल्याने त्याचा तपास प्राधान्याने करण्याचे निर्देश गुन्हे शाखा १ ला दिले . डॉ . पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या पथकाने कसोशीने तपास सुरु केला.
पोलीस पथक आरोपींच्या शोधासाठी उत्तर प्रदेश मध्ये गेले. पोलीस हवालदार पुष्पेंद्र थापा यांना आरोपी राजकुमार चौहान बद्दल महत्वाची माहिती मिळाली. त्यानंतर जून २०२१ मध्ये गुन्हे शाखेचे पथक २० दिवस वाराणसी येथे तळ ठोकून होते . उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफचे उपअधिक्षक शैलेश प्रताप सिंह, निरीक्षक अमित श्रीवास्तव, उपनिरीक्षक अंगदसिंह यादव सह पोलीस कर्मचारी अदविंद सिंह, सत्यपाल सिंह तसेच पोलीस मित्र राहुल राठोड यांनी आरोपीच्या शोधासाठी चांगले सहकार्य केले.
तपासात राजकुमार ऊर्फ काल्या हा उत्तर प्रदेशच्या बनारसचा असून कामानिमीत्त २००७ पासून आखाती देशातील कतार येथे असतो व दोन तिन महिन्याकरीता मुळ गावी परत येत असतो अशी माहिती मिळाली. २०२० मध्ये तो वोस्ट्रो अकाउंट ऑफ दोहा अँड कतार या कंपनीत आहे व लवकरच मुळ गावी येणार आहे अशी माहीती पोलिसांना मिळाली. त्याचा पासपोर्ट क्रमांक पोलिसांना सापडला. २०२१ मध्येच त्याच्या नावाने लुकआऊट नोटीस बजावण्यात आली होती.
गुरुवार २९ डिसेंबर २०२२ रोजी राजकुमार चौहान हा कतारवरून गावी उत्तर प्रदेशला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर उतरला असता विमान प्राधिकरणाने लुकआऊट नोटीस असल्याने त्याला ताब्यात घेतले व त्याची माहिती काशीमीरा पोलिसांना देण्यात आली . पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. शुक्रवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता ४ जानेवारी २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर सुनील व अनिल सरोज ह्या दोन फरार आरोपी भावांचा पोलीस शोध घेत आहेत.
गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक कैलास टोकले व पुष्पराज सुर्वे, उपनिरीक्षक हितेंद्र विचारे सह संदीप शिंदे, किशोर वाडीले, संजय पाटील, राजु तांबे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, प्रफुल्ल पाटील, विकास राजपूत, सचिन सावंत, समीर यादव, प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी यांच्या पथकाने तब्बल २८ वर्ष उघडकीस न आलेला ह्या ५ जणांच्या हत्याकांडाच्या गुन्ह्यातील पहिल्या आरोपीस अटक करण्यात यश मिळवल्या बद्दल पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी पथकाचे कौतुक केले आहे .
राजनारायण प्रजापती यांना जिवंतपणी मिळाला नाही न्याय
आपल्या पत्नी व ४ मुलांची हत्या करणाऱ्या त्या तीन आरोपीना पोलिसांनी पकडावे व त्यांना शिक्षा व्हावी अशा प्रतिक्षेत फिर्यादी राजनारायण प्रजापती हे तब्बल २८ होते . मात्र काही महिन्यां पूर्वीच त्यांचे अपघाती निधन झाले . जिवंतपणी त्यांना न्याय मिळू शकला नाही मात्र आता एक आरोपी पोलिसांच्या अटकेत आला आहे. तर अन्य दोघे आरोपी सुद्धा लवकरच सापडतील अशी आशा व्यक्त होत आहे.