नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. लग्नानंतर तीन दिवसांतच नव्या नवरीला बेदम मारहाण केल्याची, तिचा मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुप्तांगावर गरम सळईने चटके देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशच्या बदायूमधील जरीफनगर येथे ही संतापजनक घटना घडली आहे. विवाहितेला अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे. बेदम मारहाणीमुळे तिच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या आहेत. गंभीर अवस्थेत असलेल्या विवाहितेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. विवाहितेच्या वडिलांनी तिचा पती आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्या मुलीचा खूप छळ झाल्याचं म्हटलं आहे. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती आणि सासूसह कुटुंबातील सात सदस्यांविरोधात हुंड्यासाठी छळ आणि जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानपूर गावातील सुनीलचं लग्न सहसनाव क्षेत्रातील मुडारी सिधापूर गावातील उर्मिलासोबत 21 जून रोजी झालं होतं.
लग्नानंतर मुलगी सासरी जाताच सासरकडचे लोक तिचा छळ करू लागले. विवाहितेने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजेच 24 जून रोजी पती आणि सासरच्या लोकांनी तिला बेदम मारहाण केली. यानंतर तिच्या गुप्तांगावर गरम सळईने चटके दिले गेले. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली असून सासरकडच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस सध्या मेडिकल रिपोर्टची वाट पाहत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सासरच्या लोकांविरोधात एफआयआर दाखल करून घेतली आहे, तसेच पीडितेच्या पतीला अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! हुंड्यासाठी छळ, मारहाण; नातेवाईकांना जखमांचे फोटो पाठवून 'तिने' केली आत्महत्या
हुंड्यासाठी पतीकडून केला जाणारा छळ आणि मारहाण सहन न झाल्याने एका विवाहितेने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेने आत्महत्येपूर्वी मारहाणीमुळे झालेल्या आपल्या शरीरावरच्या जखमांचे फोटो आपल्या नातेवाईकांना 'व्हॉटसअॅप'वर पाठवल्याने हा भयंकर प्रकार समोर आला आहे. केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील सस्थामकोट्टामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. विस्मया असं 24 वर्षीय विवाहितेचं नाव असून ती पतीसोबत राहत होती. गेल्या वर्षी किरण कुमार नावाच्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालं. किरण हा राज्य सरकारमध्ये मोटर वाहन विभागाचा कर्मचारी आहे. विस्मयाचा घरामध्ये गळफस घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला. तिच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आत्महत्येच्या आधी विस्मयाने आपल्या नातेवाईकांना 'व्हॉटसअॅप'वर अनेक मेसेज आणि मारहाणीमुळे झालेल्या जखमांचे फोटो पाठवले होते. पतीकडून हुंड्यासाठी आपला छळ होत असल्याचं तिने म्हटलं होतं.